शिवशाहीचा दरवाजा लॉक असूनही ‘तो’ उघडला कसा? प्राथमिक चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

On: February 27, 2025 1:36 PM
pune swargate news
---Advertisement---

Pune Swargate Crime |  स्वारगेट बसस्थानकात बुधवारी पहाटे २६ वर्षीय युवतीवर बलात्कार झाल्यानंतर हा प्रकार नेमका कसा घडला, याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या शिवशाही बसमध्ये ही घटना घडली, तिचा दरवाजा लॉक असूनही तो उघडला कसा? याबाबत तांत्रिक तपासणी सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, गाडीचा एअर प्रेशर कमी झाल्याने दरवाजा आपोआप उघडला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

बसचा दरवाजा नेमका का उघडला?

घटनास्थळी चौकशी करताना पोलिसांना बस (Pune Swargate Crime) चालकाने माहिती दिली की, त्याने गाडी लॉक केली होती. मात्र, बस आगारात आल्यानंतर गाडी बंद असताना एअर प्रेशर कमी झाल्याने दरवाजा उघडला असावा. तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांनीही याची शक्यता व्यक्त केली आहे. शिवशाही बसमध्ये सेफ्टी लॉक असतो, मात्र, गाडी बंद असताना आणि एअर प्रेशर उतरल्यास लॉक केलेला दरवाजा उघडण्याची शक्यता असते.

या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (MSRTC) सर्व शिवशाही बसगाड्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षेच्या उपाययोजना देखील वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आरोपीसाठी 1 लाखाचे बक्षीस जाहीर-

या प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) हा अद्याप फरार असून त्याला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. हा आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर याआधी जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी आठ विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. त्याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, आरोपीच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.

दरम्यान, पीडित तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. ती पुण्यात नोकरी करत होती आणि फलटणला जाण्यासाठी बसस्थानकात आली होती. आरोपीने दिशाभूल करून तिला शिवशाही बसमध्ये नेले आणि त्याठिकाणी बलात्कार केला.

बसस्थानक अवैध कृत्यांचा अड्डा?

स्वारगेट (Pune Swargate Crime) बसस्थानकात राजकीय कार्यकर्त्यांनी पाहणी केली असता, काही धक्कादायक बाबी समोर आल्या. बसस्थानकात अनेक धूळखात पडलेल्या एसटी बसमध्ये मद्याच्या बाटल्या, कंडोमच्या पाकिटांचा खच पडल्याचे आढळून आले. या घटनेनंतर सुरक्षेच्या उपाययोजना वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. “हे बसस्थानक आहे की अवैध धंद्यांचा अड्डा?” असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत.

News Title : pune swargate crime new update

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now