Mobile Recharge | मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा खर्च वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दूरसंचार कंपन्या येत्या काही महिन्यांत मोबाईल रिचार्ज प्लॅन्सच्या किमतीत 12 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढ करू शकतात, असा अंदाज एका अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे. 5G नेटवर्कवरील गुंतवणूक आणि वाढत्या महसुलाच्या गरजेमुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
पुढील काही महिन्यांत रिचार्ज दर वाढण्याची शक्यता :
देशातील प्रमुख दूरसंचार कंपन्या रिलायन्स जिओ (Reliance Jio), भारती एअरटेल (Bharti Airtel) आणि व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) लवकरच मोबाईल रिचार्जच्या दरात वाढ करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, पुढील तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत रिचार्ज प्लॅन्स 12 ते 15 टक्क्यांनी महाग होण्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेल्या दरवाढीनंतरही कंपन्या पुन्हा एकदा शुल्क वाढवण्याच्या विचारात असल्याचे सांगितले जात आहे.
सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्च (Centrum Institutional Research) यांनी आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीसाठी प्रसिद्ध केलेल्या टेलिकॉम आणि इंटरनेट क्षेत्रावरील अहवालात दूरसंचार बाजारातील एकत्रीकरणामुळे दरवाढीसाठी पोषक वातावरण तयार झाल्याचे नमूद केले आहे. बाजारात मर्यादित कंपन्या उरल्यामुळे स्पर्धेचे स्वरूप बदलले असून पुढील काही महिन्यांत दरवाढ होण्याची शक्यता अधिक असल्याचे या अहवालात म्हटले आहे. तसेच जून तिमाहीत खासगी दूरसंचार कंपन्यांच्या प्रति ग्राहक सरासरी महसुलात 1 ते 1.5 टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
Mobile Recharge | 4G-5G विस्तार आणि ग्राहकसंख्येत वाढ हे प्रमुख कारण :
अहवालानुसार, ग्राहक मोठ्या प्रमाणावर 2जी सेवेतून 4G आणि 5G नेटवर्ककडे वळत आहेत. त्याचबरोबर पोस्टपेड ग्राहकांची वाढ आणि तिमाहीतील वाढलेले दिवस यामुळे दूरसंचार कंपन्यांच्या महसुलात सुधारणा होण्याची शक्यता आहे. सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्चच्या अंदाजानुसार, व्होडाफोन आयडियाच्या तुलनेत रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल यांचा बाजारातील ग्राहकांचा हिस्सा आणखी वाढू शकतो.
याच अहवालात रिलायन्स जिओ एका तिमाहीत सुमारे 70 लाख नवीन ग्राहक जोडेल, तर भारती एअरटेलकडे सुमारे 50 लाख नवीन ग्राहक येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. व्होडाफोन आयडिया सुमारे 2 लाख ग्राहकांची भर घालू शकते, असा अंदाज आहे. देशभरात 4G आणि 5G सेवांचा विस्तार वेगाने होत असल्यामुळे प्रति ग्राहक डेटा वापरातही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल यांनी देशातील 90 टक्क्यांहून अधिक जिल्ह्यांमध्ये 5G सेवा सुरू केली असून नेटवर्क विस्तारासोबत अधिक 5G उपकरणे जोडण्यावर भर दिला जात आहे. तसेच जी एफडब्ल्यूए (G FWA) आणि फिक्स्ड ब्रॉडबँड (Fixed Broadband) सेवांमध्येही चांगली वाढ होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.






