Nashik Rain Alert | नाशिक (Nashik) जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस आणि ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्र्यंबकेश्वर मंदिर, सप्तशृंगी गड दर्शन बंद करण्यासह शाळा, महाविद्यालये आणि आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहेत.
ढगफुटीच्या शक्यतेमुळे प्रशासन सतर्क :
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar), इगतपुरी (Igatpuri) आणि नाशिक शहराच्या पश्चिम भागात कमी वेळेत अतिवृष्टी होऊन ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय नाशिक तालुका, पेठ (Peint), दिंडोरी (Dindori), कळवण (Kalwan) आणि सटाणा (Satana) परिसरातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती दिली. हवामानाचा ताजा अंदाज लक्षात घेऊन ज्या भागांमध्ये धोका अधिक आहे, त्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतलेल्या बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना आखल्या आहेत. संभाव्य नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आले असून परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतले जाणार असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
Nashik Rain Alert | शाळा, बाजार आणि मंदिरे बंद; प्रवास टाळण्याचे आवाहन :
7 जुलै रोजी नाशिक शहर वगळता नाशिक तालुक्याचा ग्रामीण भाग, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये तसेच आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिवृष्टीचा अंदाज लक्षात घेता शेतकऱ्यांनी शेतात जाणे टाळावे आणि अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरड कोसळण्याचा धोका असलेल्या रस्त्यांची यादी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग (National Highways) विभागाच्या मदतीने तयार केली जाणार असून आवश्यकतेनुसार हे रस्ते बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.
त्र्यंबकेश्वर देवस्थान (Trimbakeshwar Temple) आज सूर्यास्तानंतरच्या पूजेनंतर पुढील दोन दिवस भाविकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी त्र्यंबकेश्वरला येणे टाळावे, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू असल्याने अतिरिक्त खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच 7 जुलै रोजी सप्तशृंगी देवी (Saptashrungi Devi) मंदिरातही दर्शन बंद राहणार आहे. पूर येण्याची शक्यता असलेल्या गावांची यादीही प्रशासन तयार करत असून आवश्यक त्या ठिकाणी पूर्वतयारी करण्यात येत आहे.






