Nashik Rain | नाशिक (Nashik) जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा आणि ढगफुटीसदृश परिस्थितीचा गंभीर इशारा देण्यात आल्याने प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळावे, आवश्यक अन्नसामग्रीचा साठा करून ठेवावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) प्रशासनाने केले आहे.
200 मिमीपेक्षा अधिक पावसाची शक्यता :
नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री (Manisha Khatri) यांनी सांगितले की, जिल्ह्यात 200 मिमीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान अंदाजातून व्यक्त करण्यात आली आहे. आज सायंकाळी 6 वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून मध्यरात्री 1 ते सकाळी 10 वाजेपर्यंत अतिमुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसू शकतो. त्यानंतर पावसाचा वेग कमी होण्याची शक्यता असली तरी नदी-नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह धोकादायक राहू शकतो.
या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरात विविध विकासकामे सुरू असल्याने तसेच झाडे कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून आवश्यक ती प्रतिबंधात्मक पावले उचलली जात आहेत.
Nashik Rain | आवश्यक वस्तूंचा साठा ठेवा, वर्क फ्रॉम होमचा सल्ला :
महापौर हिमगौरी आडके (Himgauri Adke) यांनी नागरिकांना शक्यतो जिथे आहेत तिथेच सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. उद्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. घरात खाण्यापिण्याच्या आवश्यक वस्तू आधीच उपलब्ध करून ठेवाव्यात आणि परिसरात झाड कोसळण्याचा किंवा इतर कोणताही धोका दिसल्यास तातडीने प्रशासनाला माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले.
याशिवाय, पडके वाडे किंवा धोकादायक इमारतींची माहिती महानगरपालिकेला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सिंहस्थ कुंभ (Kumbh Mela) संदर्भातील सुरू असलेल्या कामांची पाहणी केली जात असून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णालयीन गरजांसाठी रुग्णवाहिका आणि अन्य सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मान्सून टास्क फोर्सची नियुक्ती करून प्रत्यक्ष पाहणी केली जाणार असून गरज भासल्यास नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले जाईल. तसेच शक्य असल्यास कार्यालयीन कर्मचारी घरातून काम (Work From Home) करावेत, असा सल्लाही देण्यात आला आहे. गोदाकाठ परिसरात वाहने उभी करू नयेत तसेच नदीकाठच्या भागात विनाकारण फिरणे टाळावे, असे आवाहन पोलीस आणि महापालिका प्रशासनाने केले आहे.






