Maharashtra Rain Alert | राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून दरडी कोसळणे, पाणी साचणे आणि अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी मंगळवार, ७ जुलै रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
राज्यातील पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक भागांतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. विशेषतः नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि परिसरात ढगफुटीसदृश पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.
नाशिकमध्ये रेड अलर्ट; शाळा, कॉलेज आणि मंदिरे बंद :
हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर नाशिक जिल्हा प्रशासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी तसेच नाशिक ग्रामीण भागातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना ७ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून भाविकांच्या सुरक्षेसाठी त्र्यंबकेश्वर मंदिर आणि सप्तशृंगी मंदिरही तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हवामान विभागाच्या अंदाजाचा आढावा घेत प्रशासनाला आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. काही भागांमध्ये 300 मिमीपर्यंत पावसाची शक्यता असून ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली आहे. बचाव आणि मदत कार्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
Maharashtra Rain Alert | 21 जणांचा मृत्यू; प्रशासन अलर्ट मोडवर :
मुसळधार पावसामुळे राज्यभरात विविध दुर्घटना घडल्या असून त्यामध्ये 21 जणांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल परिसरात धबधब्यात आंघोळीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाला. अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी संवेदनशील भागांमध्ये जेसीबी, पोकलेनसह अवजड यंत्रसामग्री तैनात करण्यात आली आहे. तसेच आवश्यकतेनुसार लष्कराची मदत घेण्यासाठीही प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नदी-नाल्यांपासून दूर राहण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि शेतकऱ्यांनीही शेतात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






