Pune News | पुणे-मुंबई महामार्गावर खडकी परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या गुन्हे शाखेच्या दोन पोलिस शिपायांवर चार जणांच्या टोळीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना ३१ जुलैच्या रात्री घडली आहे. चर्च चौक खडकी येथे रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांवरच अशाप्रकारे हल्ला झाल्याने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चार जणांनी पोलिसांवर अचानक हल्ला केला :
मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल देवसिंग कोतवाल आणि काजळे अशी जखमी झालेल्या पोलिस शिपायांची नावे असून, ते दोघेही मार्शल ड्युटीवर कार्यरत होते. पेट्रोलिंगदरम्यान एका वाहनचालकाने गाडी अतिशय वेगात आणि वेडीवाकडी चालवताना दिसल्याने पोलिसांनी त्याला थांबवून विचारणा केली. या क्षुल्लक कारणावरून संतप्त झालेल्या चार जणांनी पोलिसांवर अचानक हल्ला चढवला.
या हल्ल्यात आरोपींनी पोलिसांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत जमिनीवर पाडले आणि बेदम झोडपून काढले. या मारहाणीनंतर परिसरातील नागरिकांनी मदत केली आणि पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. (Pune Crime News)
Pune News | खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल :
या प्रकरणी गोपाल देवसिंग कोतवाल यांनी तक्रार दिल्यानंतर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चारही आरोपींना अटक केली आहे. जुनेद इक्बाल शेख (वय २७), नफीज नौशाद शेख (वय २५), युनूस युसुफ शेख (वय २५) आणि आरिफ अक्रम शेख (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. केवळ गाडी व्यवस्थित चालवण्यास सांगितल्याने या आरोपींनी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना मारहाण केली.
खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा गुन्हा या आरोपींवर दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांवर अशाप्रकारचे हल्ले वाढल्याचे चित्र बघायला मिळते आहे. त्यामुळे पोलिसांनी हात उचलणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.






