पुण्यात पुन्हा हैदोस! कोयता गँगकडून गाड्यांची तोडफोड!

On: August 2, 2025 1:52 PM
Pune News (5)
---Advertisement---

Pune News | पुणे पोलीस आयुक्त ‘भयमुक्त गणेशोत्सव’ करण्याची ग्वाही देत असतानाच, पुण्यात मागील महिन्याभरात ८ ते ९ वाहन तोडफोडीच्या घटना समोर आल्या आहेत. महिन्याभराची आकडेवारी, दीड वर्षातील घटना आणि महत्त्वाचे म्हणजे यात समाविष्ट असलेल्या अल्पवयीन मुलांची टक्केवारी पाहता, पुण्यातील गुन्हेगारी सध्या गंभीर वळण घेताना दिसत आहे. वाहन तोडफोडीच्या या नव्या पॅटर्नने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या घटना थांबवण्यासाठी पुणे पोलीस ठोस उपाययोजना करताना अपयशी ठरत असल्याचा सूर नागरिकांकडून उमटत आहे. (Pune Today News)

वाहन तोडफोडीत अल्पवयीन मुलांचा समावेश :

पुण्यातील एकाच भागातून नाही, तर विविध परिसरातून या घटना समोर आल्याने पुणेकरांची रात्रीची झोप उडाली आहे. रात्रीचे पोलिसिंग होत नाही आणि सोबतच दहशत निर्माण करणाऱ्यांची अरेरावी सहन करावी लागते, अशा प्रतिक्रिया पुणेकर देत आहेत. मागील काही दिवसांच्या गुन्हेगारीची आकडेवारी बघितली, तर या सगळ्या वाहन तोडफोडीत अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचा समोर आले आहे. त्यांची टक्केवारी बघितली तर ३५ टक्के अल्पवयीन मुले कोयता गँग, वाहन तोडफोड आणि सोबतच दहशत पसरवणाऱ्या सगळ्या घटनांमध्ये दिसून येत आहेत.

या अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीपासून दूर ठेवणे पोलिसांसमोर येत्या काळात मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे ‘भयमुक्त गणेशोत्सव’ होईलच, पण ‘भयमुक्त पुणे’ कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दीड वर्षात १२४ वाहन तोडफोडीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यात सगळ्यात गंभीर बाब म्हणजे ३५ टक्के आरोपी हे अल्पवयीन असल्याचं आकडेवारी सांगते. (Pune Today News)

पुण्यात गुन्हेगारी थांबवायची असेल, तर त्यावर रोज नव्या उपाययोजना करणे किंवा गुन्हेगारांना कडक शिक्षा करणे गरजेचे दिसत आहे. खून, खुनाचे प्रयत्न, वाहन चोरी, पिस्तूलांची खरेदी-विक्री, पिस्तूल बाळगणे तसेच वाहन तोडफोड, दहशत माजवणे अशा गुन्ह्यांत अल्पवयीन मुले सहभागी आहेत आणि येणारी पिढी गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत असल्याचे दिसत आहे.

Pune News | या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण! :

पुण्यात गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या सक्रिय आहेतच, पण त्यांना सोडले तर अनेक लहान-मोठे गुन्हेगारदेखील सक्रिय असल्याचे मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे. पुण्यातील वाहन तोडफोडच्या घटनांचे काही हॉटस्पॉटदेखील आहेत. याच परिसरात मोठ्या प्रमाणात दहशत माजवणे, वाहनांची तोडफोड करणे, नागरिकांना त्रास देणे हे सगळे प्रकार दिसत आहेत.

कोंढवा, सहकारनगर, विश्रांतवाडी या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सलग तीन दिवस वाहन तोडफोडीचे प्रकार घडले. एकापाठोपाठ घडलेल्या या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Pune Today Crime News)

शहरात वाहन तोडफोडीच्या दीड वर्षात तब्बल १२४ घटना घडल्या असून, त्यामध्ये गेल्या वर्षी (२०२४) ८९ घटना घडलेल्या आहेत. त्यातील ८१ गुन्हे उघडकीस आले असून, २५५ आरोपी आहेत. त्यात अल्पवयीन ८७ मुलांचा सहभाग होता. चालू वर्षात ३५ घटनांत ८२ आरोपींपैकी ५० मुले अल्पवयीन आहेत. या आकडेवारीवरून अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असल्याचे स्पष्ट होते.

News Title: Pune Shaken: Lawlessness Continues as Vehicle Vandalism Rises; 35% of Accused Are Minors, Police Face Major Challenge with 124 Incidents in 1.5 Years

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now