पुणेकरांनो पाणीपुरवठ्या संदर्भात अत्यंत महत्वाची बातमी! वाचा सविस्तर

On: July 14, 2026 4:52 PM
Pune water cut
---Advertisement---

Pune Water Cut | पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पावसाने पुन्हा उघडीप घेतल्याने महापालिका प्रशासनाने 15 जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. धरणांतील पाणीसाठा आणि हवामानाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

वारीनिमित्त नियमित झाला होता पाणीपुरवठा :

जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात मोठी घट झाली होती. त्यानंतर जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार पुणे महापालिकेने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. मात्र, जुलैच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आणि 6 जुलै रोजी मुळशी व पिंपरी-चिंचवड परिसरातील अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीलाही पूर आला होता.

आषाढी वारीसाठी पुण्यात आलेल्या लाखो वारकऱ्यांची आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने 7 जुलैपासून पाणीकपात तात्पुरती रद्द करत नियमित पाणीपुरवठा सुरू केला होता. पालखी सोहळा 12 जुलैपर्यंत पुण्यातून मार्गस्थ होईपर्यंत ही व्यवस्था कायम ठेवण्यात आली होती.

Pune Water Cut | पावसाने उघडीप घेतल्याने प्रशासनाचा निर्णय :

जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे धरणसाखळीत 16 टीएमसीपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाला होता. खडकवासला धरण सुमारे 85 टक्के भरल्याने नदीपात्रात दीड टीएमसी पाणीही सोडण्यात आले होते. त्यामुळे पाणीकपात कायमस्वरूपी हटवली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरतील की नाही, याबाबत पुन्हा चिंता निर्माण झाली आहे.

हवामान विभाग आणि जलसंपदा विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पाऊस कमी राहण्याची शक्यता असल्याने भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून 15 जुलैपासून पुन्हा एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात पावसाचा जोर वाढून धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाल्यास परिस्थितीचा पुनर्विचार करून नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.

News Title: Pune Returns to Alternate Water Supply

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now