Pune Ganeshotsav 2025 | राज्य शासनाने सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, पुण्यातील गणेशोत्सवाची शान आणखी वाढणार आहे. यंदा सात दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाच्या वापरास परवानगी मिळाली आहे. मात्र, गणेशोत्सव निर्विघ्न आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी जिल्ह्यातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. (Pune Ganeshotsav २०२५)
किमान चार सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक :
या बैठकीत गिल यांनी गणेश मंडळांना काही विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वं पाळण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. विशेषतः सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवणे आणि कर्णकर्कश लाऊडस्पीकर वा लेझर शो टाळणे या मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे.
गणेशोत्सव काळात सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक गणेश मंडळाने किमान चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे स्पष्ट निर्देश पोलिसांनी दिले आहेत. त्याचबरोबर लाऊडस्पीकरचा अतिरेकी वापर, ध्वनीप्रदूषण वाढवणारे कार्यक्रम आणि लेझर शो टाळण्याचं आवाहन करण्यात आलं. या उपाययोजनांमुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणं सोपं होईल आणि शांततेत उत्सव पार पडेल, अशी अपेक्षा आहे. (Pune Ganeshotsav २०२५)
Pune Ganeshotsav 2025 | १२८ गणेश मंडळांची उपस्थिती
ही आढावा बैठक ग्रामीण पोलीस मुख्यालयात घेण्यात आली. लोणावळा, खेड, जुन्नर आणि शिरूर उपविभागातील १८ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण १२८ गणेश मंडळांचे अध्यक्ष तसेच पोलीस पाटील या बैठकीला उपस्थित होते. गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षिततेत पार पाडण्यासाठी पोलिस व मंडळांमध्ये समन्वय साधणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं अधोरेखित करण्यात आलं.
गणेशोत्सव हा सांस्कृतिक एकतेचा आणि भक्तीभावाचा उत्सव असून, पोलिसांच्या या सूचनांमुळे यंदाचा उत्सव अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पडेल, अशी अपेक्षा आहे.






