Bandu Andekar | पुण्यात आयुष कोमकर हत्याकांडानंतर आरोपी बंडू आंदेकर (Bandu Andekar) आणि त्याच्या टोळीवर पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. नानापेठ परिसरात आंदेकर टोळीची अवैध बांधकामे पाडण्याची मोहीम पुणे महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.
गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला ५ सप्टेंबर रोजी पार्किंगमध्ये गोळ्या झाडून आयुष कोमकरची (Ayush Komkar) हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी बंडू आंदेकरवर (Bandu Andekar) संशयाची सुई होती. पोलिसांनी त्याच्यासह टोळीतील अनेकांना अटकही केली होती. आता या हत्याकांडाशी संबंधित गुन्ह्यांनंतर बंडू आंदेकरविरोधात थेट अवैध मालमत्तेवर कारवाई करण्यात येत आहे.
नानापेठेत अवैध बांधकाम पाडले :
सोमवारी सकाळपासून पुणे पोलिस आणि महापालिका पथक नानापेठेत (Pune Nana Peth demolition) दाखल झाले. आंदेकर टोळीने उभारलेली अवैध बांधकामे पाडण्याची मोहीम सुरू करण्यात आली. यामध्ये टोळीचे अनधिकृत फ्लेक्स, बॅनर हटवण्यात आले आहेत. एवढंच नव्हे, तर माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्या स्मृतिस्थळ म्हणून उभारलेली पाणपोईसुद्धा गॅस कटरने काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वी पोलिसांनी आंदेकर टोळीची (ANdekar Gang) तब्बल २७ बँक खाती गोठवली होती. बंडू आंदेकरच्या संपत्तीचा शोध सुरू असतानाच या खात्यांची माहिती समोर आली होती. आता अवैध बांधकामावरही हातोडा चालवण्यात येत असल्याने बंडू आंदेकरविरोधातील कारवाईचा हा सर्वात मोठा टप्पा मानला जात आहे.
Bandu Andekar | हत्या आणि बदल्याचा गुन्हेगारी मागोवा :
गेल्या वर्षी पुण्यात वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात गणेश कोमकर (Ganesh Komkar) आरोपी असून तो सध्या तुरुंगात आहे. तर आता हत्या झालेला आयुष कोमकर हा गणेश कोमकरचा मुलगा होता.
पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आपल्या नातवाचा बदला घेण्यासाठीच बंडू आंदेकरने आयुषची हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे.






