पुण्यात रात्री 7 नंतर पेट्रोल, डिझेल मिळणार नाही? वाहनचालकांमध्ये चिंता वाढली

On: November 18, 2025 5:20 PM
Pune Petrol Pump
---Advertisement---

Pune Petrol Pump | पुणे शहरात वाहनचालकांसाठी चिंताजनक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वितरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुण्यातील पेट्रोल डिलर्स असोसिएशनने नुकतंच एक निवेदन प्रसिद्ध करून संध्याकाळी 7 नंतर पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. यामुळे हजारो वाहनचालकांना मोठी गैरसोय संभवते.

असोसिएशनने पोलीस प्रशासनाकडे लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केलं आहे की, पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवर वाढत्या हल्ल्यांमुळे त्यांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था सुधारण्याबाबत ठोस पावलं उचलली नाहीत, तर सेवा वेळेत बदल करण्यावाचून पर्याय राहणार नाही, असे निवेदनात नमूद केले आहे.

पेट्रोल पंपांवर मारहाणीच्या घटना वाढल्या; चालकांचा रोष :

अलीकडेच येरवडा परिसरातील इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. ही घटना शहरात मोठ्या प्रमाणात चर्चेत आली. तसंच भैरोबा नाला भागातील दुसऱ्या पेट्रोल पंपावरही अशाच प्रकारची मारहाण घडली होती. सलग घटना घडल्यामुळे पेट्रोल पंप चालक आणि कर्मचारी मोठ्या चिंतेत आहेत.

या घटनांमध्ये आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, पोलिसांनी पेट्रोल पंपांवर सुरक्षा व्यवस्था वाढवावी तसेच रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, अशा मागण्या पेट्रोल डिलर्स असोसिएशनने केल्या आहेत. यासाठी त्यांनी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले आहे.

Pune Petrol Pump | रात्रीच्या वेळी भांडणे वाढली; 7 नंतर विक्री बंद करण्याची शक्यता :

रात्री अपरात्री पेट्रोल पंपांवर भांडणांच्या घटना वाढू लागल्या आहेत. अनेकदा मद्यधुंद अवस्थेत लोक पेट्रोल पंपांवर येतात आणि किरकोळ कारणांवरून वाद घालतात. यामुळे कर्मचारी असुरक्षित वाटत असून अनेकांना मारहाणीला सामोरं जावं लागतं. या परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न पेट्रोल डिलर्स उभा करत आहेत.

असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा व्यवस्थेबाबत कोणतीही ठोस कृती न झाल्यास, पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर संध्याकाळी 7 नंतर पेट्रोल-डिझेलची विक्री बंद केली जाऊ शकते. हा निर्णय लागू झाल्यास वाहनचालकांसह रुग्णवाहिका व आवश्यक सेवांवरही त्याचा परिणाम दिसू शकतो.

वाहनचालकांची चिंता वाढली; पोलिसांकडून निर्णयाची प्रतीक्षा :

पेट्रोल डिलर्स असोसिएशनच्या या इशाऱ्यामुळे पुण्यातील वाहनचालकांमध्ये चिंता वाढली आहे. आधीच वाहतूक कोंडी आणि दैनंदिन प्रवासामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशा वेळी पेट्रोल पंप रात्री बंद राहिल्यास नागरिकांची गैरसोय आणखी वाढू शकते. (Pune Petrol Pump)

सध्या पोलीस प्रशासन हा इशारा गांभीर्याने घेऊन परिस्थितीचा आढावा घेत आहे. सुरक्षेच्या मुद्द्यांवर नेमकं कोणतं पाऊल उचललं जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पेट्रोल पंप चालकांनी मागण्या मान्य झाल्यास 7 नंतर पंप खुले ठेवण्याची तयारी दर्शवली आहे.

News Title: Pune Petrol Pump News: Fuel Supply May Stop After 7 PM Amid Rising Attacks on Staff

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now