Navale Bridge Rule | पुण्यातील नवले पुलावर झालेल्या भीषण अपघाताने राज्यभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. मागील आठवड्यात ब्रेक फेल कंटेनरने आठ जणांचा बळी घेतल्यानंतर, या परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर PMPML प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीचे आणि महत्त्वाचे निर्णय लागू करण्यास सुरुवात केली आहे. (Navale Bridge Rule)
नवले पुलाच्या उतारावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे वाहतूक आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यामुळे आता केवळ वेगमर्यादा लागू न करता PMPML ने या परिसरातील धोकादायक बस थांबा तात्काळ स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन बस स्टॉप मुख्य वाहतूक प्रवाहापासून दूर सुरक्षित ठिकाणी करण्यात येणार आहे.
PMPMLचा कठोर निर्णय: वेगमर्यादा आता फक्त 30 किमी प्रतितास :
कात्रज नवीन बोगदा ते चांदणी चौक या अपघातप्रवण उतारावर PMPML बस चालकांना प्रतितास ३० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने न चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश अत्यंत कठोर असून त्याचे काटेकोर पालन करण्यास सांगण्यात आले आहे. या मार्गावर PMPMLच्या बसेसला वेग कमी ठेवणे बंधनकारक आहे.
फक्त वेगमर्यादेवर नियंत्रण न ठेवता, बस चालकांना नवीन नियमांची माहिती आणि विशेष सुरक्षा प्रशिक्षण दिले जात आहे. प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी थांबता यावे म्हणून PMPML ने सध्याचा बस स्टॉप ताबडतोब हलवला असून सुरक्षितता उपायांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झालेली आहे.
Navale Bridge Rule | अतिरिक्त उपाययोजना: स्पीड गन्स, फलक आणि अतिक्रमण हटवणी :
या परिसरात आधीच वाहने 60 किमी वेगाने चालत होती. आता ही मर्यादा 30 किमीवर आणली आहे आणि वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पीड गन्सची संख्या तीनवरून सहा करण्यात येणार आहे. तसेच रस्त्यावरील दिशा फलक, सूचना बोर्डांची संख्या वाढवून वाहनचालकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला जाईल.
याशिवाय, अवजड वाहनांचा लोड खेड-शिवापूर (Khed-Shivapur) टोलनाक्यावर तपासला जाईल. जादा वजन आढळल्यास दंड आकारून लोड कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित सर्व यंत्रणांना आपल्या हद्दीतील अतिक्रमणे तातडीने हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत, ज्यामुळे रस्त्याची क्षमता वाढेल आणि अपघातांची शक्यता कमी होईल.






