प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुणे-नाशिकचा प्रवास दोन तासांनी कमी होणार

On: September 3, 2025 12:35 PM
Pune-Nashik Highway
---Advertisement---

Pune-Nashik Highway | पुणेकर आणि नाशिककरांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते राजगुरुनगर (खेड) या ३० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे उन्नतीकरण होणार असून, सध्या दीड ते दोन तास लागणारा प्रवास अवघ्या ३० मिनिटांत पूर्ण होणार आहे. या प्रकल्पासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, २५ सप्टेंबर रोजी निविदा खुल्या होणार आहेत.

भूसंपादनाची प्रक्रिया :

या प्रकल्पासाठी सुमारे १४ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. प्रस्तावित मार्गिका मुख्यत्वे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) हद्दीत येते. एकूण १५० जमीनमालकांकडून ९.७४ हेक्टर जमीन संपादित करण्याची गरज आहे. ही जमीन नाणेकरवडी, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, चिंबळी, कुरुळी, मेदनकरवाडी आणि चाकण परिसरातील आहे. भूसंपादनासाठी हस्तांतरण विकास हक्क (TDR) आणि चटई क्षेत्र निर्देशांक (FSI) या पर्यायांचा वापर होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत भोसरी व मोशी भागातही भूसंपादनाची आवश्यकता आहे. बहुतांश जमीन महापालिकेने आधीच टीडीआर आणि एफएसआयच्या बदल्यात संपादित केली असून, उर्वरित जमिनीसाठी राज्य सरकारकडे निधी मागण्यात आला आहे. (Pune-Nashik Highway)

Pune-Nashik Highway | प्रकल्पाचा उद्देश आणि खर्च :

या उन्नत मार्गिका प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे शहरी वाहतूक कोंडी कमी करणे आणि प्रवासाचा वेळ वाचवणे हा आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी ७८२७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चाकण एमआयडीसीसह औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक सुलभ होईल.

या मार्गिकेसाठी एकूण १० प्रवेश आणि निर्गमनमार्ग असतील. त्यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी विकासाला चालना मिळेल. (Pune-Nashik Highway)

दरम्यान, या उन्नत मार्गिकेसोबतच बालेवाडी–शेडगे वस्ती, सूर्या हॉस्पिटल–ठाकर वस्ती, नांदे-माण रोड अशा रस्ते विस्तार प्रकल्पांवरही काम सुरू आहे. त्याचबरोबर बहुप्रतिक्षित पुणे वर्तुळाकार रस्त्याचे कामही टप्प्याटप्प्याने सुरू आहे. या सर्व प्रकल्पांमुळे शहरी गतिशीलतेला गती मिळणार आहे.

News Title: Pune-Nashik Highway Upgrade: Travel Time to Reduce by 2 Hours, NHAI Begins Tender Process

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now