Pune Municipal Election 2026 | पुणे महानगरपालिकेच्या 2026 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक 24 केंद्रस्थानी आला आहे. 2017 साली गाजलेली गणेश बीडकर आणि रवींद्र धंगेकर यांच्यातील लढत यंदाही नव्या रूपात पाहायला मिळणार आहे. मात्र, यावेळी थेट रवींद्र धंगेकर नव्हे, तर त्यांचे सुपुत्र प्रणव धंगेकर मैदानात उतरले असून, भाजपकडून गणेश बीडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पारंपरिक लढतीत आता अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून गणेश नवथरे यांची एन्ट्री झाल्याने प्रभागात राजकीय गणितं पूर्णपणे बदलली आहेत.
यंदाच्या निवडणुकीत या प्रभागात नेहमीप्रमाणे दुहेरी नव्हे, तर थेट तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तिन्ही उमेदवार मजबूत असल्याने कोण बाजी मारणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, या तिरंगी लढतीचा सर्वाधिक फटका शिवसेना उमेदवार प्रणव धंगेकरांना बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. (Pune Municipal Election 2026)
प्रभाग क्रमांक 24 मध्ये युती तुटली, तिरंगी लढतीची ठिणगी :
प्रभाग क्रमांक 24 मधून भाजपकडून गणेश बीडकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित होती. दुसरीकडे, रवींद्र धंगेकर यांनाही आपल्या मुलासाठी याच प्रभागातून उमेदवारी हवी होती. महायुतीतून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न झाले, मात्र हे गणित जुळून आले नाही. अखेर भाजप आणि शिवसेनेने या प्रभागात स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्याने युती तुटल्याच्या चर्चांना उधाण आले. (Ravindra Dhangekar)
याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने संधी साधत या प्रभागात ताकदवान उमेदवार देण्याची रणनीती आखली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर अजित पवार यांनी गणेश नवथरे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे बीडकर-धंगेकर लढतीत अजितदादांच्या उमेदवाराची अधिकृत एन्ट्री झाली आणि राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली.
Pune Municipal Election 2026 | नवथरे धंगेकरांचे जवळचे; मतांची विभागणी होणार? :
गणेश नवथरे (Ganesh Navthare) हे नाव जरी अनेकांसाठी नवीन असले, तरी ग्राऊंड लेव्हलवर त्यांची चांगली ओळख आहे. कसबा गणपती, कमला नेहरू हॉस्पिटल आणि K.E.M. हॉस्पिटल परिसरात त्यांनी प्रत्यक्ष काम केले असून, त्यांचा जनसंपर्क मजबूत असल्याचे सांगितले जाते. विशेष बाब म्हणजे, नवथरे हे रवींद्र धंगेकर यांचे अत्यंत जवळचे सहकारी राहिले आहेत. मागील निवडणुकांमध्ये धंगेकरांच्या प्रचाराची आणि संघटनाची मोठी जबाबदारी नवथरे यांनी सांभाळली होती.
आता मात्र तेच नवथरे अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने धंगेकर गटासाठी ही मोठी डोकेदुखी ठरू शकते. धंगेकरांचे काही कार्यकर्ते आणि स्थानिक यंत्रणा नवथरेकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे प्रणव धंगेकरांच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता असून, त्याचा थेट फायदा भाजप उमेदवार गणेश बीडकर (Ganesh Bidkar) यांना होऊ शकतो. (Pune Municipal Election 2026)
एकंदरीत, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 24 ही लढत केवळ प्रतिष्ठेची नसून, राजकीय गणितांची खरी कसोटी ठरणार आहे. बीडकर, धंगेकर आणि नवथरे यांच्यातील ही तिरंगी लढत पुण्यातील निवडणुकीचा निकाल कुठल्या दिशेने जाईल, याचे संकेत देणारी ठरू शकते.






