Pankja Munde | राज्यात महापालिका निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असून 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात दररोज नव्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी पारंपरिक राजकीय समीकरणे बदलताना दिसत असून, कट्टर विरोधक एकत्र येताना तर काही ठिकाणी जुन्या संघर्षांना पूर्णविराम मिळत असल्याचे चित्र आहे. अशाच पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका विधानाने बीड जिल्ह्यातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Maharashtra Municipal Election 2026)
संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा प्रचंड चर्चेत आला होता. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर आरोप झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले. त्यानंतर प्रचंड दबावाखाली धनंजय मुंडे यांनी आरोग्याचे कारण देत मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या सगळ्या घडामोडींनंतर अनेक वर्षांपासून राजकीयदृष्ट्या वेगळ्या वाटा चालणारे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पुन्हा एकत्र आल्याचे चित्र दिसू लागले.
परळी हा कायमच वादाचा मुद्दा :
परळी हा मतदारसंघ पंकजा मुंडे (Pankja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यात कायमच राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू राहिला आहे. एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला असलेली परळी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या ताब्यात होती. मात्र धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर परळीत एनसीपीची ताकद वाढली. अलीकडेच परळी नगरपालिका धनंजय मुंडे यांच्या ताब्यात गेल्याने राजकीय समीकरणे अधिकच बदलली.
या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांमध्ये परळीतून नेमके कोण लढणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. याच चर्चांना पूर्णविराम देणारे वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी एका जाहीर सभेत केले.
‘परळी धनुभाऊंना दिली’, पंकजा मुंडेंचे स्पष्ट विधान :
जाहीर सभेत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी परळी धनुभाऊंना देऊन टाकली आहे. आता परळी धनंजय मुंडे सांभाळतात. मला परळीवर जितकं प्रेम आहे, तितकंच प्रेम माळाकोळीवर आहे. आता मी माळाकोळी सांभाळणार.” (Parli Politics)
पुढे त्या म्हणाल्या, “मी त्यांना सांगितलं, हा तुमचा मतदारसंघ आहे, तुम्ही त्यावर प्रेम करा. परळीचं प्रेम धनुभाऊंना करू द्या. मला माळाकोळीवर प्रेम करू द्या.” या वक्तव्यातून पंकजा मुंडेंनी परळीच्या राजकारणातून माघार घेण्याचे आणि माळाकोळीवर लक्ष केंद्रित करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
Pankja Munde | माळाकोळीवर लक्ष केंद्रीत होणार? :
माळाकोळी हा मतदारसंघ गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा राहिला आहे. त्यांनी या मतदारसंघावर विशेष लक्ष दिले होते. आता पंकजा मुंडे यांनी माळाकोळीबाबत प्रेम व्यक्त केल्याने आगामी काळात त्या मतदारसंघात त्यांची भूमिका अधिक सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंकजा मुंडेंच्या या वक्तव्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. परळी धनंजय मुंडे तर माळाकोळी पंकजा मुंडे, अशी स्पष्ट विभागणी झाल्याचे संकेत या विधानातून मिळत असून, आगामी निवडणुकांमध्ये याचा नेमका कसा परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.






