Rahul Narvekar | महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. 15 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील 29 महापालिकांसाठी मतदान होणार असून, सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. (Maharashtra Municipal Elections 2026)
हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, कार्यकर्त्यांवर दमदाटी करणे, निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करणे आणि संविधानिक पदाचा गैरवापर करणे या प्रकरणांमध्ये राहुल नार्वेकर दोषी आहेत. अशा व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. निवडणूक आयोग कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे आयोग सैराटपणे वागत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
संविधानिक पदांचा गैरवापर; राष्ट्रपतींकडे बडतर्फीची मागणी :
विधानसभा अध्यक्षांना दिलेले विशेष अधिकार संविधानाच्या चौकटीत वापरले जाणे अपेक्षित असते. मात्र राहुल नार्वेकर यांनी या अधिकारांचे हनन केल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. आर्थिक भ्रष्टाचार, संविधानिक स्वरूपातील भ्रष्टाचार आणि प्रशासकीय व्यवस्थेमध्ये दबाव टाकण्याचा प्रकार अशा तीन स्तरांवर नार्वेकर दोषी असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे राष्ट्रपतींनी तात्काळ हस्तक्षेप करून त्यांची बडतर्फी करावी, अशी स्पष्ट मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
ते पुढे म्हणाले की, निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असतो. नागरिकांनी निर्भयपणे मतदान करणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. मात्र सध्या राज्यात पैशांचा खेळ सुरू असून ‘बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपया’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नगरपरिषद निवडणुकांमध्ये पैसे फेकून तमाशा पाहिला गेला आणि हाच प्रकार आता महापालिकांमध्ये सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
Rahul Narvekar | भाजपवर घोडेबाजाराचा आरोप; निवडणूक आयोग मूक साक्षीदार? :
भाजपने निवडणूक जिंकण्याआधीच घोडेबाजार मांडल्याचा आरोप करत हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan sapkal) यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी हा लढा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर होत असताना निवडणूक आयोग मूक साक्षीदार बनल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. (Maharashtra Municipal Elections 2026)
निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर पुरावे मागून जबाबदारी झटकली जात असल्याचा दावा सपकाळ यांनी केला. टोकन देऊनही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले गेले नाहीत, दुपारी चार नंतरचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले आणि स्वतः राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) कार्यालयात जाऊन दमदाटी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. विधानसभा अध्यक्षांचे वर्तन मवाली प्रवृत्तीचे असल्याची टीकाही त्यांनी केली. (Election Commission Maharashtra)
या सर्व प्रकरणामुळे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, राहुल नार्वेकर यांच्यावर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






