पुणेकरांनो सावध राहा! ‘या’ गोष्टीचा नियमभंग केला तर थेट कारवाई होणार

On: November 21, 2025 12:20 PM
Pune Garbage Fine
---Advertisement---

Pune Garbage Fine | पुणे शहरातील वाढता कचरा आणि त्याची अयोग्य विल्हेवाट यामुळे पुणे महापालिकेने आता अधिक कडक भूमिका घेतली आहे. ओल्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत नियमांचे पालन न करणाऱ्या सोसायट्या आणि व्यावसायिक आस्थापनांवर थेट कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे विशेषतः 100 किलोपेक्षा जास्त ओला कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या आणि हॉटेल्सना आता सावध राहावे लागणार आहे. (Pune PMC Waste Rules)

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी शहरातील सर्व आरोग्य निरीक्षकांना आदेश दिले आहेत की, त्यांच्या अधिकारक्षेत्रातील मोठ्या आस्थापनांचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करावे आणि कचरा प्रक्रिया (Pune Garbage Fine) न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करावी. पालिकेच्या म्हणण्यानुसार, शहरात सुमारे 1942 आस्थापना अशा आहेत ज्या नियमितपणे मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करतात, परंतु त्यावर प्रक्रिया करत नाहीत.

काय आहेत नियम आणि कोणाला पाळावे लागणार? :

सन 2000 च्या बांधकाम नियमावलीनुसार सर्व मोठ्या सोसायट्या, हॉटेल्स, मंगल कार्यालये आणि व्यावसायिक संकुलांनी त्यांच्या आवारातच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. प्रशासनाच्या मते, या आस्थापनांकडून दररोज 20 टनांपेक्षा जास्त ओला कचरा प्रक्रिया होणे अपेक्षित आहे. मात्र सद्यस्थितीत ही मात्रा अत्यल्प आहे आणि बहुतेक ठिकाणी कचरा थेट महापालिकेच्या अवलंबून टाकला जातो.

अतिरिक्त आयुक्त कौर यांनी निरीक्षकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यरत आहेत की नाही याची नियमित तपासणी करावी आणि आवश्यक असल्यास अडचणींसंबंधी विस्तृत अहवाल प्रशासनाकडे सादर करावा. नियमांचे पालन न करणाऱ्यांना नोटीस देऊन दंड करणे आणि तातडीने नियम लागू करवून घेणे ही जबाबदारी निरीक्षकांवर सोपवण्यात आली आहे.

Pune Garbage Fine | ग्रामीण भागातही धक्कादायक प्रकार, कारवाईचे आदेश :

कचरा व्यवस्थापनातील निष्काळजीपणाचा एक गंभीर प्रकार ग्रामीण भागातही उघड झाला आहे. लोणीकाळभोर येथील वडाळेवस्ती परिसरात वन विभागाच्या जागेत मोठ्या प्रमाणात मिश्र कचरा टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. तपासात शेतीला ओला कचरा पुरवण्याच्या नावाखाली प्रत्यक्षात मिश्रित कचरा फेकला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. (Pune PMC Waste Rules)

या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने संबंधित दोषींवर दोन दिवसांत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कौर यांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारे पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यावर धोका निर्माण करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. (Pune Garbage Fine)

पुण्यात सध्या १७ खाजगी संस्था कचरा प्रक्रिया तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन देत आहेत. प्रशासनाच्या नव्या धोरणामुळे येत्या काही दिवसांत कचरा व्यवस्थापनात लक्षणीय सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिक आणि आस्थापनांनी आता नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून, अन्यथा दंड आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

News Title: Pune Municipal Corporation to Take Strict Action Against Waste Rule Violations — Over 100 KG Wet Waste Units Targeted

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now