म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सोडतीसंदर्भात निराशाजनक बातमी! ‘त्या’ 4186 घरांच्या लॉटरीची प्रतीक्षा वाढली

On: December 15, 2025 7:05 PM
MHADA Lottery 2026
---Advertisement---

MHADA Pune Lottery | पुण्यात स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना पुन्हा एकदा निराशा सहन करावी लागली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाची 4186 घरांसाठीची बहुप्रतीक्षित सोडत दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. मंडळाकडून 16 किंवा 17 डिसेंबर रोजी सोडत जाहीर केली जाईल, अशी माहिती देण्यात आली होती. मात्र ऐनवेळी तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया रद्द करण्यात आल्याने अर्जदारांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. (MHADA Pune Lottery)

या सोडतीसाठी तब्बल 2 लाख 15 हजारहून अधिक नागरिकांनी अर्ज केले असून, प्रत्येकजण लॉटरीच्या तारखेची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र वारंवार होणाऱ्या विलंबामुळे अर्जदारांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह परिसरातील मध्यमवर्गीयांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची मानली जात होती.

दोन वेळा मुदतवाढ, तांत्रिक अडचणी ठरल्या कारण :

म्हाडा पुणे मंडळाने सप्टेंबर महिन्यात पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर आणि सोलापूर येथे एकूण 4186 घरांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली होती. यामध्ये 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील 3222 घरे आणि 15 टक्के एकात्मिक योजनेतील 864 घरांचा समावेश आहे. मात्र संगणकीय प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे सोडत प्रक्रियेला वारंवार अडथळे येत आहेत. (MHADA Lottery Delay)

याआधी 21 नोव्हेंबर रोजी होणारी सोडत 11 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा 16 किंवा 17 डिसेंबरची तारीख जाहीर करण्यात आली. मात्र अर्जांची छाननी आणि प्रारूप यादी तयार होण्यास विलंब झाल्याने दुसऱ्यांदा सोडत पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला.

MHADA Pune Lottery | 2 लाखांहून अधिक अर्ज, लवकरच नवीन तारीख? :

या 4186 घरांसाठी एकूण 2 लाख 15 हजार 847 अर्ज अनामत रकमेसह दाखल झाले आहेत. या अर्जांमधून म्हाडाकडे तब्बल 446 कोटी 97 लाख रुपयांची अनामत रक्कम जमा झाली आहे. एवढ्या मोठ्या संख्येतील अर्जांची छाननी करताना तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. (MHADA Housing Scheme)

दरम्यान, सोमवारी सायंकाळी 6 वाजता पात्र अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. या यादीवर हरकती मागवून त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच सोडतीची नवीन तारीख जाहीर केली जाईल, अशी माहिती पुणे मंडळाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे 2 लाखांहून अधिक अर्जदारांना त्यांच्या स्वप्नातील घरासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

News Title: Pune MHADA Lottery Delayed Again, 4186 Homes Draw Date Yet to Be Announced

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now