Pune Metro | राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. पुण्यात मानाच्या गणपतींसह असंख्य मंडळांचे देखावे पाहण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक गर्दी करतात. यावर्षी भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (पुणे महामेट्रो)ने एक मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव काळात पुणे मेट्रो रात्री उशिरापर्यंत धावणार असून विसर्जनाच्या दिवशी तब्बल 41 तास अखंड सेवा सुरू राहणार आहे.
मेट्रो प्रशासनाच्या माहितीनुसार, गणेशोत्सव काळात रात्री दोनपर्यंत सेवा वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे मध्यरात्रीनंतरही भाविकांना गर्दी टाळून सुरक्षितपणे प्रवास करता येणार आहे. गणेशभक्तांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी असून, पुण्यातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीवरील ताणही कमी होणार आहे. ( Ganeshotsav Pune Metro Timing)
न्यायालय ते स्वारगेट मार्गावरील सोय :
यावर्षी गणेशोत्सव काळात जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा नवा मेट्रो मार्ग देखील सुरू झाल्याने भाविकांना विशेष सोय होणार आहे. या मार्गावरील कसबा, मंडई आणि स्वारगेट ही स्थानके थेट मानाच्या गणपतीजवळ आहेत. त्यामुळे पारंपरिक दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भक्तांना थेट मेट्रोने पोहोचता येणार आहे.
गर्दी टाळण्यासाठी मेट्रो प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. मंडई स्टेशनवर एका बाजूने प्रवेश आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, गर्दीच्या वेळेत मेट्रो फेऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवास करता येईल.
Pune Metro | वेळापत्रकात मोठा बदल :
गणेशोत्सवाच्या पहिल्या तीन दिवसांत (27 ते 29 ऑगस्ट) पुणे मेट्रो सेवा सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत सुरू राहील. तर 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या काळात सेवा सकाळी 6 पासून रात्री 2 वाजेपर्यंत उपलब्ध असेल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी (6 सप्टेंबर) मेट्रो सलग 41 तास धावणार आहे. त्या दिवशी सकाळी 6 वाजता सुरू झालेली सेवा दुसऱ्या दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत अखंड चालणार आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या आणि रात्री उशिरापर्यंत फिरणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गर्दी नियंत्रणासाठी विशेष उपाय :
पुणे शहरातील मध्यवर्ती भागात विशेषतः कसबा गणपती, मंडई, तुळशीबाग या भागांत गर्दी प्रचंड वाढते. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामेट्रो प्रशासन, पुणे पोलिस आणि वाहतूक विभाग एकत्रित नियोजन करणार आहेत. मेट्रो स्थानकांतही सुरक्षा वाढवण्यात आली असून, गर्दीच्या वेळी एकमार्गी प्रवेश आणि बाहेर पडण्याची व्यवस्था केली जाईल. (Pune Metro Timing)
मेट्रो प्रशासनाने भाविकांना आवाहन केले आहे की, या विशेष सोयीचा लाभ घ्यावा, गर्दी टाळून सार्वजनिक वाहतूक वापरावी आणि सुरक्षित गणेशोत्सव साजरा करावा.






