पुणेकरांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज! ४ प्रमुख महामार्ग जोडले जाणार

On: November 21, 2025 2:05 PM
Maharashtra Expressway
---Advertisement---

Pune Mega Project | पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. महाविद्यालये, आयटी कंपन्या, नवे प्रकल्प आणि लोकसंख्या वाढ यामुळे रस्त्यांवर दररोज प्रचंड वाहतूक दिसून येते. या गंभीर समस्येवर आता उपाय म्हणून एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुढे आला आहे. (Pune Mega Project)

शहरातील वाढत्या वाहतुकीला पर्याय म्हणून आता पुण्यात सुमारे 45 किलोमीटर लांबीचा भूमिगत रस्ता बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे वाहतुकीचा ताण कमी होणार असून शहरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांमधील प्रवास वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

चार प्रमुख महामार्गांना जोडणारा ‘गेम चेंजर’ रस्ता :

या भूमिगत रस्त्याची सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे हा रस्ता अहिल्यानगर (Ahilyanagar), सोलापूर (Solapur), सातारा (Satara) आणि मुंबई (Mumbai) या चार प्रमुख राष्ट्रीय महामार्गांना एकमेकांशी जोडणार आहे. त्यामुळे पुणे शहरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात शिस्तबद्ध होऊ शकते. तज्ञांच्या मते, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत आणि आधुनिक होणार आहे.

या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला असून तो PMRDA कडे सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला होता आणि या प्रकल्पाला प्राथमिक मान्यता देण्यात आली आहे. हा रस्ता ट्विन टनेल तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे.

Pune Mega Project | तीन टप्प्यांत काम; 20-22 हजार कोटी खर्चाचा अंदाज :

या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मार्गात शिवाजीनगर–येरवडा, येरवडा–खडीमशीन चौक, जगताप डेअरी–कोथरूड, स्वारगेट आणि कात्रज ही प्रमुख प्रवेशद्वारे असणार आहेत. हा संपूर्ण मार्ग ३० मीटर खोल भूमिगत सहापदरी रस्ता असेल ज्यामुळे वाहतूक अधिक वेगाने आणि सुरक्षिततेने चालू शकणार आहे.

प्राथमिक अहवालानुसार या प्रकल्पावर 20 ते 22 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. PMRDAची मंजुरी मिळाल्यानंतर प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला जाईल. अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि बांधकाम काळात शहरातील वाहतूक व्यवस्थेसाठी पर्यायी प्लॅन तयार केला जाणार आहे.

वाहतूक कोंडीपासून मुक्तीची आशा :

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील कोथरूड, सेनापती बापट रोड, स्वारगेट (Swargate), लष्कर परिसर, येरवडा यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. प्रवास वेळ 40 ते 60 टक्क्यांनी कमी होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या मार्गामुळे पुण्यातील भूमिगत मेट्रो प्रकल्पालाही कोणताही अडथळा येणार नाही. (Pune Mega Project)

पुणेकरांसाठी हा प्रकल्प केवळ वाहतुकीचा नाही, तर शहराच्या भविष्यातील पायाभूत विकासाचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आता नागरिकांचे लक्ष या प्रकल्पाला सरकारकडून अंतिम मंजुरी कधी मिळते आणि प्रत्यक्ष काम कधी सुरू होते याकडे लागले आहे.

News Title: Pune Mega Project: 45 KM Underground Road to Connect Four Major Highways; PMRDA Submits Master Plan

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now