Pune Curfew | पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने 14 दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. आगामी सण, राजकीय कार्यक्रम, आंदोलने आणि इतर संभाव्य घडामोडी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात शस्त्रे बाळगण्यापासून ते परवानगीशिवाय पाच किंवा अधिक जणांनी एकत्र येण्यापर्यंत अनेक बाबींवर निर्बंध राहणार आहेत.
18 ते 31 ऑगस्टपर्यंत आदेश लागू :
विशेष शाखेचे पोलीस उपआयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 37 (1)(3) अंतर्गत हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. 18 ऑगस्ट 2026 रोजी मध्यरात्री 12.01 वाजल्यापासून या आदेशांची अंमलबजावणी सुरू झाली असून 31 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत ते लागू राहणार आहेत. त्यामुळे पुणे शहरात सलग 14 दिवस जमावबंदीचे निर्बंध असतील.
या कालावधीत विविध सण आणि राजकीय घडामोडी होणार असल्याने प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. याच काळात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा पुण्यात विद्यार्थ्यांसाठी ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम नियोजित आहे. जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला पोलिसांकडून परवानगी मिळणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
Pune Curfew | शस्त्रे, वादग्रस्त घोषणा आणि रील्सवर निर्बंध :
ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन यांसारखे सण या कालावधीत येत आहेत. त्याचबरोबर राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून मोर्चे, धरणे, निदर्शने, संप तसेच उपोषणे आयोजित होण्याची शक्यता असते. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवायांमुळेही काही ठिकाणी तणाव निर्माण होऊ शकतो. या सर्व शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत.
नवीन आदेशानुसार शस्त्रे, लाठ्या, तलवारी, दाहक किंवा स्फोटक पदार्थ तसेच दगड अथवा फेकण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू जमा करणे किंवा जवळ बाळगणे निषिद्ध असेल. कोणत्याही व्यक्तीचे चित्र, पुतळा किंवा प्रतीकात्मक प्रेत प्रदर्शित करून त्याचे दहन करण्यासही मनाई आहे. गुन्हेगारांचे व्हिडीओ किंवा रील्स तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करणे, त्यातून दहशत निर्माण करणे अथवा धमकी देणे यावर कारवाई होऊ शकते. याशिवाय जातीय सलोखा बिघडवणारी भाषणे, आक्षेपार्ह घोषणा, भडक गाणी आणि वादग्रस्त फलक किंवा चित्रे प्रदर्शित करण्यासही बंदी आहे. पोलिसांची पूर्वपरवानगी नसताना पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे, सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे देखील प्रतिबंधित करण्यात आले आहे.






