Kartik Aaryan | बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याच्याबाबत चाहत्यांची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यानंतर त्याला मुंबईतील माहिम येथील फोर्टिस रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.
शूटिंगदरम्यान गुडघ्याला दुखापत :
कार्तिक आर्यन सध्या दिग्दर्शक कबीर खान (Kabir Khan) यांच्या आगामी चित्रपटासाठी काम करत आहे. याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. दुखापत झाल्यानंतर त्याला उपचारासाठी माहिममधील फोर्टिस रहेजा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे समजते. कार्तिक सध्या 35 वर्षांचा असून त्याच्या अचानक झालेल्या दुखापतीची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्तिकच्या प्रकृतीबाबत चाहत्यांकडून सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली जात असून तो लवकर बरा व्हावा, यासाठी अनेक जण शुभेच्छा देत आहेत. कार्तिक आणि कबीर खान यांची यापूर्वी ‘चंदू चॅम्पियन’ (Chandu Champion) या चित्रपटासाठी जोडी जमली होती. 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता हीच अभिनेता-दिग्दर्शकाची जोडी पुन्हा एका प्रोजेक्टसाठी एकत्र आली असताना शूटिंगदरम्यान कार्तिकला दुखापत झाली आहे.
Kartik Aaryan | राष्ट्रीय पुरस्कारानंतर कार्तिकची घोडदौड :
गेल्या काही काळात कार्तिक आर्यनच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. ‘चंदू चॅम्पियन’मध्ये त्याने पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याला 72 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार त्याने मल्याळम सुपरस्टार ममूटी (Mammootty) यांच्यासोबत शेअर केला. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याची घोषणा झाल्यानंतर कार्तिकने सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत अनेक वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली होती.
पुरस्कार मिळाल्यानंतर कार्तिक आपल्या आई-वडिलांसोबत उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरातही गेला होता. तेथे त्याने भगवान महाकालांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. हे यश त्याच्या अभिनय कारकिर्दीतील महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक ठरले आहे. दुसरीकडे, आता दुखापतीमुळे त्याच्या आगामी कामाच्या वेळापत्रकावर काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे.






