Pune News | पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे मुठा नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर पोहोचले असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शहराच्या विविध भागात वाहतूक विस्कळीत झाली असून काही ठिकाणी पाणी साचल्याने हालअपेष्टा सुरू आहेत. (Pune Flood Alert)
धरणांचा साठा ९७ टक्क्यांवर :
खडकवासला प्रकल्पातील टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये तब्बल २८.४४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे, जो एकूण क्षमतेच्या ९७.५८ टक्के इतका आहे. गेल्या २४ तासांतच धरणांमध्ये साडेपाच टक्क्यांनी पाण्याची भर पडली असून, टेमघर धरण परिसरात १०५ मिमी पावसाची सर्वाधिक नोंद झाली आहे.
पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे मुठा नदीत तब्बल ३५ हजार क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणांच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्याने ओढे-नाले फुगले आहेत. त्यामुळे शहरात पोहोचणारा प्रवाह धरणातून सोडलेल्या पाण्यापेक्षा अधिक असू शकतो. (Pune Flood Alert)
Pune News | नागरिकांना सतर्कतेचा इशारा :
यामुळे पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन खडकवासला प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी केले आहे.
दरम्यान या संबंधित यंत्रणांनी पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक ती तयारी देखील केली आहे.






