Bandu Andekar | पुण्यातील नाना पेठ परिसरातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर (Bandu Andekar) याच्या घरावर पुणे पोलिसांनी मोठी धाड टाकली. बुधवारी (१० सप्टेंबर) संध्याकाळी सुरू झालेली ही कारवाई गुरुवारी (११ सप्टेंबर) पहाटेपर्यंत सुरू होती. तब्बल ११ तास चाललेल्या या झडतीत पोलिसांनी कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला आहे.
झडतीत सापडलेलं घबाड :
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडू आंदेकरच्या घरातून मोठ्या प्रमाणात सोनं-नाणं, रोकड आणि महत्वाची कागदपत्रं सापडली. (Bandu Andekar Raid)
७७० ग्रॅम सोन्याचे दागिने – किंमत अंदाजे ८५ लाख रुपये
३१ हजारांची चांदी
२ लाख ४५ हजार रुपये रोकड
१० पेक्षा अधिक साठेखतं, पॉवर ऑफ अटर्नी, बँकेची पासबुकं, करारनामे, कर पावत्या, पेनड्राईव्ह
एक कार
याशिवाय, वृंदावनी, स्वराज आणि तुषार वाडेकर यांच्या घरातूनही २१ हजार रुपये रोकड, १६ मोबाईल, दागिन्यांच्या पावत्या आणि एक दुचाकी पोलिसांनी जप्त केली.
Bandu Andekar | घराच्या सुरक्षेसाठी २५ सीसीटीव्ही कॅमेरे :
पोलिसांनी सांगितले की, बंडू आंदेकरने आपल्या घराच्या परिसरात २५ पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. घराच्या शंभर मीटरच्या परिघात हे कॅमेरे असल्याने परिसरावर सतत लक्ष ठेवता येत होतं. पोलिसांच्या धाडीनंतर हे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे.
५ सप्टेंबर रोजी बंडू आंदेकरच्या नातीचा मुलगा आयुष कोमकर याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणात बंडू आंदेकरसह टोळीतील आठ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Bandu Andekar)
ही धाड मकोका कारवाईनंतर बंडू आंदेकरच्या (Bandu Andekar) घरावर झालेली पहिली मोठी झडती मानली जात आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली असून तपास सहायक पोलिस आयुक्त शंकर खटके यांच्या अखत्यारीत आहे.
वर्षश्राद्धानंतर कट रचला? :
पोलिस तपासात समोर आलं की, १ सप्टेंबर २०२४ रोजी वनराज आंदेकर हत्येला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी २२ ऑगस्टला आंदेकर कुटुंबाने वर्षश्राद्ध केलं होतं. त्यानंतर बंडू आंदेकर आणि त्याचे घरचे केरळला देवदर्शनासाठी गेले होते. या काळात बदला घेण्याचा कट रचल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.






