Pune CNG Price | पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) परिसरातील वाहनधारकांना बुधवारी सकाळीच महागाईचा मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) ने सीएनजीच्या दरात प्रति किलो 2.50 रुपयांची वाढ जाहीर केली असून नवीन दर मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत. या वाढीमुळे दैनंदिन प्रवास करणारे नागरिक, रिक्षाचालक आणि व्यावसायिक वाहनधारकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
सीएनजी दरवाढीमागे जागतिक कारणे :
नवीन दरानुसार पुण्यात आता सीएनजीची किंमत 94.75 रुपये प्रति किलो झाली आहे. यापूर्वी हा दर 92.25 रुपये प्रति किलो होता. या वाढीचा परिणाम पुण्यासह चाकण (Chakan), तळेगाव (Talegaon), हिंजवडी (Hinjewadi) आणि आसपासच्या औद्योगिक तसेच आयटी पार्क परिसरातील लाखो वाहनधारकांवर होणार आहे.
एमएनजीएलकडून मे महिन्यात करण्यात आलेली ही दुसरी मोठी दरवाढ आहे. याआधी 8 मे रोजी सीएनजीच्या दरात 1.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. कंपनीच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूच्या खरेदी खर्चात वाढ झाल्यामुळे ही दरवाढ करावी लागली आहे. विशेषतः अमेरिका (United States) आणि इराण (Iran) यांच्यात वाढत असलेल्या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.
Pune CNG Price | इतर वस्तूंच्याही किमती वाढल्या :
सीएनजी महागल्यामुळे वाहतूक खर्चात वाढ झाली असून त्याचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या खर्चावर दिसू लागला आहे. हॉटेलमधील जेवण आणि नाश्त्याच्या दरात 15 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे समोर आले आहे. तसेच बेकरी उत्पादनांवरही परिणाम झाला असून पावाच्या किमतीत प्रत्येकी 5 रुपयांची वाढ झाली आहे.
दरम्यान, इतर शहरांतील सीएनजी दरांची तुलना केली असता नवी मुंबई (Navi Mumbai) येथे प्रति किलो दर 96.95 रुपये, नाशिक (Nashik) मध्ये 93.65 रुपये आणि मुंबई (Mumbai) मध्ये 84 रुपये आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की, दरवाढ झाली असली तरी सीएनजी हे पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत अजूनही स्वस्त इंधन आहे. तसेच घरगुती वापरासाठी पुरवण्यात येणाऱ्या पीएनजी (PNG) गॅसच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.






