पुण्यातील PMPML बसच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती, घेतला हा मोठा निर्णय!

On: March 13, 2025 3:38 PM
pmpml bus
---Advertisement---

Pune PMPML | पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने प्रवाशांच्या सुविधेसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लवकरच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील PMPML बसमध्ये ‘Next Stop Announcement’ म्हणजेच पुढील थांब्याची स्वयंचलित घोषणा करणारी प्रणाली सुरू करण्यात येणार आहे.

यामुळे वरिष्ठ नागरिक, दृष्टिहीन आणि अपंग प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या ४,००० हून अधिक बस थांब्यांसाठी ऑडिओ रेकॉर्डिंग अंतिम टप्प्यात असून लवकरच चाचणी सुरू केली जाणार आहे.

प्रवाशांसाठी उपयोगी ठरणार प्रणाली-

आतापर्यंत मेट्रो, रेल्वे आणि विमानतळांवर ही सुविधा उपलब्ध होती, मात्र  PMPML बसमध्ये अशी कोणतीही सुविधा नव्हती. त्यामुळे दृष्टिहीन, अपंग आणि वयोवृद्ध प्रवाशांना त्यांच्या थांब्यांबाबत अडचणी येत होत्या.

तसेच, पुण्यात (Pune PMPML) नवीन असलेल्या प्रवाशांनाही आपल्या थांब्यांबाबत सतत इतर प्रवाशांची मदत घ्यावी लागत होती. PMPML च्या या नवीन घोषणापद्धतीमुळे प्रवाशांना स्वतंत्र आणि अधिक सोयीस्कर प्रवास अनुभवता येणार आहे.

याशिवाय, प्रवाशांनी चुकीच्या थांब्यावर उतरणे किंवा ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्यासोबत गैरसमज होण्याच्या घटनांनाही यामुळे आळा बसेल. PMPML च्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सार्वजनिक वाहतुकीच्या सेवेत सुधारणा करण्याचा आणि प्रवाशांना सहज प्रवास अनुभव देण्याचा हा एक भाग आहे.

GPS तंत्रज्ञानासह PMPML च्या सेवेत मोठी सुधारणा-

PMPML सध्या ४७२ मार्गांवर बस सेवा चालवते आणि पुणे, पिंपरी-चिंचवड (Pune PMPML) तसेच PMRDA हद्दीत या बस धावतात. नव्याने सादर केल्या जाणाऱ्या ‘Next Stop Announcement’ प्रणालीमध्ये जीपीएस तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.

PMPML बसमध्ये आधीपासूनच जीपीएस प्रणाली बसवण्यात आलेली आहे आणि याच तंत्रज्ञानाच्या मदतीने PMPML मोबाईल अॅपद्वारे प्रवाशांना त्यांची बस कोणत्या थांब्यावर आहे, याची माहिती मिळू शकणार आहे.

प्रत्येक बसमध्ये अत्याधुनिक स्पीकर प्रणाली बसवली जाणार असून प्रत्येक थांब्याची घोषणा वेळेवर आणि स्पष्ट ऐकू येईल, याची काळजी घेतली जाणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी करण्यात आलेला हा बदल सार्वजनिक वाहतुकीच्या आधुनिकतेकडे PMPML चा मोठा पाऊल टाकण्याचा प्रयत्न मानला जात आहे.

News Title : PMPML Buses to Get ‘Next Stop Announcement’ System

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now