New Scheme for Farmer | देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठं दिवाळी गिफ्ट जाहीर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी तब्बल ₹35,440 कोटींच्या दोन मोठ्या कृषी योजनांचा शुभारंभ केला आहे. या दोन योजनांमध्ये ‘डाळ स्वावलंबन अभियान’ आणि ‘पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना’ यांचा समावेश आहे.
समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदींनी या दोन्ही योजनांचा प्रारंभ केला. त्याचबरोबर कृषी, पशुपालन, मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्राशी संबंधित ₹5,450 कोटींपेक्षा जास्त किमतीचे प्रकल्प उद्घाटन करण्यात आले, तर ₹815 कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली.
‘डाळ स्वावलंबन अभियान’ : देशात डाळींचं उत्पादन वाढवणार :
या योजनेवर केंद्र सरकार ₹11,440 कोटी रुपये खर्च करणार आहे. उद्दिष्ट स्पष्ट आहे की, 2030-31 पर्यंत देशातील डाळींचं उत्पादन 25.2 दशलक्ष टनांवरून 35 दशलक्ष टनांपर्यंत नेण्याचं. यामुळे देशाचं आयात अवलंबित्व कमी होऊन शेतकऱ्यांना अधिक बाजारभाव मिळणार आहे.
सरकारचं म्हणणं आहे की, भारताने प्रथिनेयुक्त अन्नधान्याच्या क्षेत्रात स्वावलंबी व्हावं, हेच या मोहिमेचं प्रमुख ध्येय आहे. त्यामुळे या योजनेत नव्या बियाण्यांचा वापर, पाण्याचं व्यवस्थापन आणि उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे.
New Scheme for Farmer | ‘पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना’ : मागास जिल्ह्यांचा कायापालट :
दुसऱ्या योजनेअंतर्गत सरकार ₹24,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. ही योजना देशातील 100 मागास जिल्ह्यांमध्ये कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यावर केंद्रित आहे.
या माध्यमातून पीक उत्पादन वाढवणं, वेगवेगळी हंगामी पिकं घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणं, सिंचन सुविधा, पाणी साठवणूक क्षमता वाढवणं आणि कर्ज उपलब्धतेत सुधारणा करणं हे उद्दिष्ट आहे. दोन्ही योजनांना मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून त्या रब्बी हंगाम 2025 पासून 2030-31 पर्यंत चालू राहणार आहेत.
पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला :
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत विजेत्या शेतकऱ्यांना सन्मानित केलं. तसेच प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रे (PMKSK) आणि कॉमन सर्व्हिस सेंटर्स (CSC) यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.
मोदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधत सांगितलं की, “शेती, पशुपालन आणि मत्स्यपालन क्षेत्रात भारताने आत्मनिर्भर व्हावं, हे आमचं उद्दिष्ट आहे. या योजनांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल.”
या कार्यक्रमाला कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह, तसेच कृषी राज्यमंत्री भागीरथ चौधरी उपस्थित होते.






