Pune News | पिंपरी-चिंचवडमधील नेहरूनगर प्रभाग क्रमांक 9 हा एकेकाळी झोपडपट्ट्यांसाठी कुप्रसिद्ध मानला जात होता. अनेक दशकांपासून येथील नागरिक अस्वच्छ आणि असुरक्षित परिस्थितीत राहत होते. मात्र राज्य शासनाच्या स्लम रिहॅबिलिटेशन अॅथॉरिटी (SRA) अंतर्गत सुरू झालेल्या पुनर्वसन प्रकल्पामुळे या भागातील रहिवाशांचे जीवनमान बदलत आहे. (Nehrunagar Slum Redevelopment)
या योजनेअंतर्गत एकूण 2777 झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी आतापर्यंत 1249 कुटुंबांना नवे घरे देण्यात आली आहेत, तर उर्वरित 1528 कुटुंबांचे पुनर्वसन सध्या सुरू आहे. या प्रकल्पामुळे प्रभाग क्रमांक 9 हळूहळू झोपडपट्टीमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नवी घरे :
या पुनर्वसन प्रकल्पांतर्गत यशवंत नगर, आंबेडकर नगर, विठ्ठलनगर, राजीव गांधी वसाहत, साईनाथ नगर आणि खराळवाडीतील भारतमाता नगर यांसारख्या झोपडपट्ट्यांचा विकास केला जात आहे. विशेष म्हणजे नागरिकांना 300 चौ. फुट क्षेत्रफळाची आधुनिक घरे देण्यात आली आहेत. (Pune Slum Rehabilitation)
या घरांमध्ये पाणी, वीज, स्वच्छतागृहे, पक्के रस्ते, लिफ्ट, सोलर प्रकल्प, कचरा व्यवस्थापन, सीएनजी गॅस सुविधा, सुरक्षा व्यवस्था तसेच अंगणवाडी यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे पावसाळ्यातील गळती, अस्वच्छता आणि आरोग्याचे धोके मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत.
Pune News | रहिवाशांचा आनंद आणि सुरक्षित भविष्य :
नवीन घरांमुळे नागरिकांना सुरक्षित छप्पर मिळाले आहे. मुलांच्या शिक्षणासाठी योग्य वातावरण तर महिलांच्या आरोग्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित जागा उपलब्ध झाली आहे. नव्याने घर मिळालेल्या कुटुंबांनी “गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आम्हाला हक्काचे घर मिळाले” असा आनंद व्यक्त केला. (Nehrunagar Slum Redevelopment)
दरम्यान, विठ्ठलनगरमधील नागरिकांना तात्पुरते नेहरूनगरमधील एच.ए. मैदानावर स्थलांतरित करून पुनर्वसन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे नेहरूनगर भाग झोपडपट्टीमुक्तीच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा गाठत असून, रहिवाशांच्या जीवनमानात मोठा बदल घडून येत आहे.






