Pimpri-Chinchwad News | पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातील रहिवासी आणि सोसायटी परिसरात नियमबाह्यपणे चालणाऱ्या मद्यविक्री दुकानांमुळे (Liquor Shops) नागरिकांना होणाऱ्या त्रासाविरोधात स्थानिक आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. या पाठपुराव्याला यश आले असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) शहरातील चार मद्यविक्री दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी (Collector Jitendra Dudi) यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
नागरिकांच्या तक्रारी आणि आमदार लांडगेंचा विधानसभेत आवाज
पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागांमध्ये, विशेषतः रहिवासी क्षेत्रात आणि सोसायट्यांच्या आवारात असलेल्या काही दारू दुकानांच्या नियमबाह्य कारभारामुळे आणि अनधिकृत विक्रीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले होते. याबाबत सोसायटीधारकांनी आणि नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आमदार लांडगे यांनी केला होता.
या समस्येची गंभीर दखल घेत आमदार महेश लांडगे यांनी नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी मद्यविक्री करणाऱ्या दुकानदारांच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची आणि नियमबाह्य काम करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी केली होती. या मागणीमुळे हा विषय राज्यभर चर्चेत आला होता आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (DyCM Ajit Pawar) यांच्यासह सभागृहातील सर्वपक्षीय आमदारांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत, नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते.
परवाने रद्दची कारवाई
विधानसभेतील आश्वासनानंतर आमदार महेश लांडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे याप्रकरणी सातत्याने पाठपुरावा केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत भोसरी विधानसभा मतदारसंघातील (Bhosari Assembly Constituency) चिखली (Chikhali) व मोशी (Moshi) परिसरातील चार दुकानांमध्ये नियमबाह्यपणे दारू विक्री होत असल्याचे आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले.
या चार दुकानांमध्ये श्रीमती उषा चौधरी देशी दारू दुकान (Smt. Usha Choudhary Desi Daru Dukaan), मे. एम. डी. के. बिअर शॉपी (M/s M.D.K. Beer Shopee), मे. गोल्डन बिअर शॉपी (M/s Golden Beer Shopee) आणि लकी बिअर शॉपी (Lucky Beer Shopee) यांचा समावेश आहे. उत्पादन शुल्क विभागाने याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. या अहवालाच्या आधारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या चारही दुकानांचा मद्यविक्रीचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. “आम्ही केलेल्या तक्रारींमधील चार दुकानांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे,” असे आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे.






