Pimpri Chinchwad Crime | पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात दिवाळीच्या दिवशी घडलेली सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर (Nakul Bhoir) यांच्या हत्येची घटना आता धक्कादायक वळणावर आली आहे. पत्नी चैताली भोईर हिनेच पतीचा गळा आवळून खून केल्याचं समोर आलं होतं, मात्र तपासात तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार याचाही यात सहभाग असल्याचं उघड झालं आहे. दोघांनी मिळून थंड डोक्याने हा क्रूर कट रचला होता. (Pimpri Chinchwad Crime)
पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली असून, तपासादरम्यान मिळालेल्या CCTV फुटेजने संपूर्ण खेळच पलटवला आहे. घटनास्थळी सिद्धार्थ पवार उपस्थित असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
अनैतिक संबंधातून पेटला खूनाचा वाद :
नकुल भोईर यांना पत्नी चैतालीचे सिद्धार्थसोबतचे अनैतिक संबंध कळल्यानंतर पती-पत्नीमध्ये वारंवार वाद व्हायचे. घटनेच्या दिवशीदेखील दोघांमध्ये तीव्र वाद झाला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या नकुलवर चैतालीने रागाच्या भरात कापडाने गळा आवळायला सुरुवात केली. नकुल जीवाच्या आकांताने तडफडत असताना, तिथेच उपस्थित असलेल्या सिद्धार्थनेही चैतालीची साथ दिली आणि ओढणीचं दुसरं टोक आवळत नकुलचा श्वास रोखला.
या घटनेनंतर चैतालीने सिद्धार्थला तिथून निघून जाण्यास सांगितले आणि गुन्ह्याची जबाबदारी स्वतःवर घेत पोलिसांना फोन केला. मात्र घटनास्थळी पोलिस पोचल्यावर त्यांना तफावत आढळली. तिथे तीन व्यक्तींनी दारू प्यायल्याचे पुरावे मिळाल्याने पोलिसांनी संशय घेत चौकशीचा तपास अधिक तीव्र केला.
Pimpri Chinchwad Crime | CCTV फुटेजने उघड केली आरोपींची पोलखोल :
पोलिसांनी घटनास्थळावरील CCTV फुटेज तपासल्यावर सिद्धार्थ पवार घटनास्थळी आला आणि परत गेला यातील वेळ आणि त्याच्या जबाबात दिलेल्या वेळेत विसंगती आढळली. त्यामुळे पोलिसांनी त्याला कसून चौकशीसाठी ताब्यात घेतले. अखेर दबावाखाली सिद्धार्थने गुन्ह्याची कबुली देत सांगितले की, चैतालीसोबत मिळून त्यांनी नकुलचा खून केला.
या प्रकरणात दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असून, 1 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक दीपक गोसावी यांनी दिली. या प्रकरणाने पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यात खळबळ उडाली आहे.






