Phaltan Doctor Murder Case | फलटण येथील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणानंतर राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी मृत डॉक्टरच्या वडिलांनी अत्यंत भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या लेकराला न्याय देण्याऐवजी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “ज्यांनी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले, त्यांच्या तोंडात किडे पडोत,” असे त्यांनी कठोर शब्दांत म्हटले. घटनेनंतर सुरुवातीला आम्हाला काहीच सांगण्यात आले नाही आणि तिच्या जवळ जाऊ दिले नाही, असाही गंभीर आरोप त्यांनी केला.
त्यांनी पुढे सांगितले की, “तुम्ही चांगलं राहा, मी चांगली राहते. या भाऊबिजेला घरी येते,” असे शेवटचं बोलणं माझ्या लेकराचं झालं होतं. इतकी संस्कारी आणि संवेदनशील मुलगी आत्महत्या करूच शकत नाही. त्यामुळे या प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून दोषींना फाशी द्या,” अशी मागणी त्यांनी केली.
‘ती आत्महत्या नाही, हत्या झाली आहे’ — वडिलांचा आरोप :
डॉक्टरच्या वडिलांनी स्पष्ट आरोप केला की, “ही आत्महत्या नसून हत्या आहे.” ते म्हणाले, “घटना घडण्याच्या एक दिवस आधी आम्ही तिच्याकडे गेलो होतो. ती अगदी आनंदात होती. त्यामुळे ती स्वतःला संपवेल हे अशक्य आहे. माझ्या लेकराचा छळ करणाऱ्यांना फाशी झालीच पाहिजे, मग ते खासदार असो वा आमदार.” या प्रकरणी राजकीय प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
कुटुंबीयांनी या प्रकरणाची सुनावणी बीड न्यायालयात व्हावी आणि तपासात महिला अधिकाऱ्यांचा समावेश असावा, अशी मागणी केली आहे. “माझ्या लेकराला मी किती कष्टाने मोठं केलं, हे सांगणं अवघड आहे,” असं म्हणत वडिलांना अश्रू अनावर झाले.
Phaltan Doctor Murder Case | शवविच्छेदन अहवाल पोलिसांकडे, तपासात नवे धागे :
दरम्यान, फलटणमधील महिला डॉक्टरचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांच्या हाती आला आहे. प्राथमिक निष्कर्षानुसार तिच्या शरीरावर कोणत्याही जखमा नसून गळफास घेऊन मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र मृत्यूच्या आधी डॉक्टर महिलेचे गोपाळ बदनेसोबत फोनवर संवाद झाल्याचे तपासात उघड झाले आहे.
पोलिसांच्या हाती गोपाळ बदने, प्रशांत बनकर आणि मृत डॉक्टरचा सीडीआर रेकॉर्ड लागला आहे. परंतु गोपाळ बदनेने अद्याप आपला मोबाईल पोलिसांकडे जमा केलेला नाही. या मोबाईलमध्ये अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे असावेत, अशी शक्यता तपास अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पोलिसांसमोर आता मोठं आव्हान उभं राहिलं आहे.






