Petrol Diesel Rate Hike | राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत चर्चा सुरू असतानाच काही शहरांमध्ये इंधनाच्या किंमतीत किरकोळ बदल झाल्याची माहिती समोर आली आहे. आखाती देशांमधील युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने भविष्यात दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अशातच महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोलच्या दरात बदल झाल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत अलीकडेच 60 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ होईल का, अशी भीती सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली होती. दरम्यान, काही शहरांमध्ये साध्या पेट्रोलच्या किंमती स्थिर असल्या तरी प्रीमियम किंवा स्पीड पेट्रोलच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
स्पीड पेट्रोलच्या दरात वाढ :
सोलापूरसह काही शहरांमध्ये साध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सोलापुरात साधे पेट्रोल सुमारे 104 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मात्र स्पीड पेट्रोलच्या दरात 2 रुपयांची वाढ झाली असून त्याची किंमत 111 रुपयांवरून 113 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. (Petrol Diesel Rate Hike News)
पुण्यातील काही पेट्रोल पंपांवरही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. साध्या पेट्रोलचे दर स्थिर असले तरी प्रीमियम पेट्रोल महाग झाले आहे. पेट्रोल पंप चालकांच्या मते, सध्या इंधनाचा साठा पुरेसा आहे आणि कोणताही तुटवडा नाही. मात्र दरवाढीच्या चर्चेमुळे काही ग्राहक पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करत असल्याचेही सांगितले जात आहे.
Petrol Diesel Rate Hike | कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण :
दरम्यान, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत शुक्रवारी मोठी घसरण दिसून आली. गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 119 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास होते, मात्र त्यानंतर जवळपास 14 डॉलरने घसरल्याची नोंद झाली. तसेच अमेरिकन क्रूड डब्ल्यूटीआयचा भावही 100 डॉलरच्या पातळीवरून सुमारे 8 डॉलरने कमी झाला.
मध्यपूर्वेतील युद्ध परिस्थितीमुळे काही दिवस कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या होत्या. मात्र इस्रायलचे पंतप्रधान यांनी इराण आता कमकुवत झाल्याचे आणि युद्ध लवकर संपण्याची शक्यता व्यक्त केल्यानंतर बाजारात काहीसा दिलासा मिळाला. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याचे दिसून आले आहे.






