Pune Engineering College Ban | पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील ‘पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ मध्ये उघडकीस आलेल्या परीक्षा गैरप्रकारामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईसाठी शिफारशी केल्या असून, कॉलेजवर १० वर्षांची बंदी येण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांकडून परीक्षा संपल्यानंतर रात्रीच्या अंधारात पुन्हा उत्तरपत्रिका लिहून घेतल्याचा आरोप या कॉलेजवर झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी पैशांच्या मोबदल्यात विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका परत देऊन नव्याने उत्तरं लिहायला लावली. (Parvatibai Genba Moze Engineering College Ban)
विद्यापीठाची तत्काळ कारवाई; समितीची चौकशी :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने याची गंभीर दखल घेत तत्काळ एक चौकशी समिती नेमली. या समितीचे नेतृत्व देविदास वायदंडे यांनी केलं असून, त्यांच्यासोबत डॉ. प्रमोद पाटील, डॉ. सुनील ठाकरे, डॉ. सुनीता आढाव आणि समीर भोसले यांचा समावेश होता.
समितीने संबंधित कॉलेजला भेट देत सखोल तपास करून विद्यापीठ प्रशासनाला अहवाल सादर केला.
अहवालात कडक शिफारशी :
अहवालात पुढील कडक शिक्षेच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत:
– कॉलेजचं परीक्षा केंद्र पुढील १० वर्षांसाठी बंद ठेवावं
– संस्थेला ₹३ लाखांचा आर्थिक दंड ठोठवावा
– दोषी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ३ वर्ष परीक्षा कामांपासून दूर ठेवावं
– हा अहवाल विद्यापीठाच्या अधिकार मंडळासमोर सादर होणार असून अंतिम निर्णय लवकरच अपेक्षित आहे.
केवळ परीक्षा गैरप्रकार नाही, तर शिक्षण व्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह :
या प्रकारामुळे फक्त एक संस्थाच नव्हे, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. विद्यापीठाने स्पष्ट केलं आहे की संस्थेमध्ये पूर्णवेळ प्राचार्य आणि पात्र प्राध्यापकांची नेमणूक आवश्यक आहे, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत. (Pune College Exam Scam)
हा निर्णय केवळ एका कॉलेजपुरता मर्यादित राहणार नसून, इतर संस्थांसाठीही चेतावणी ठरणार आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित राहावे यासाठी विद्यापीठाच्या धोरणात्मक कृतीची सर्वत्र नोंद घेतली जात आहे.






