Parliament Monsoon Session | संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. 21 जुलै 2025 पासून 12 ऑगस्ट 2025 पर्यंत हे अधिवेशन पार पडणार आहे. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली असून, या अधिवेशनात ‘ऑपरेशन सिंदूर’ वर खास चर्चा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (Parliament Monsoon Session)
‘ऑपरेशन सिंदूर’वर संसदेच्या अधिवेशनात चर्चा :
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे देशभरात खळबळ उडाली होती. ही कारवाई दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणारी ठरली. मात्र, या मोहिमेबाबत सरकारने अजूनही सविस्तर खुलासा केलेला नाही. त्यामुळे विरोधकांनी विशेष अधिवेशनाची मागणी करत या मोहिमेतील यश, उद्दिष्ट आणि परिणाम यावर खुली चर्चा व्हावी, अशी मागणी केली होती.
सत्ताधारी भाजपने ही मागणी फेटाळली असून, ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चेसाठी स्वतंत्र अधिवेशन घेण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. पावसाळी अधिवेशनातच यावर शासकीय नियमांतर्गत सविस्तर चर्चा घडवून आणली जाईल, असे रिजिजूंनी सांगितले.
Parliament Monsoon Session | 2025 मधील दुसरे अधिवेशन :
या वर्षातले हे दुसरे अधिवेशन आहे. याआधी 31 जानेवारी रोजी संसद अधिवेशन सुरू झाले होते, जे 4 एप्रिल रोजी स्थगित करण्यात आले होते. तीन महिन्यांच्या खंडानंतर आता पुन्हा अधिवेशन सुरू होत असून, याकडे देशभराचे लक्ष लागले आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या मुद्द्यावर संसदेत चर्चा झालीच पाहिजे, असा विरोधकांचा दबाव कायम आहे. १६ पक्षांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र दिलं होतं, मात्र विशेष सत्राऐवजी यावर पावसाळी अधिवेशनातच चर्चा होईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.






