Pakistani Cricketer Abrar Ahmed| पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमद सध्या ‘द हंड्रेड’ लिलावामुळे भारतात प्रचंड चर्चेत आहे. सनरायझर्स लीड्स संघाने त्याला विकत घेतल्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. काव्या मेननचा संघ सनरायझर्स लीड्सने या पाकिस्तानी खेळाडूवर बोली लावल्यामुळे भारतात याच्या संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
अबरार अहमद कोण आहे?
अबरार अहमद हा पाकिस्तानचा एक ‘मिस्ट्री स्पिनर’ आहे. त्याचा जन्म 11 सप्टेंबर 199 रोजी कराची येथे झाला. त्याने आपल्या फिरकीच्या जोरावर अत्यंत कमी वेळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावले आहे. त्याने 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले, जिथे त्याने पहिल्याच सामन्यात 11 बळी घेऊन इतिहास रचला होता. सध्या तो आयसीसी (ICC) टी-20 गोलंदाजी क्रमवारीत चौथ्या स्थानावर असून पाकिस्तानच्या प्रमुख फिरकीपटूंपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत 38 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 52 बळी घेतले आहेत.
द हंड्रेड लिलाव आणि वाद
‘द हंड्रेड’ 2026 च्या लिलावात सनरायझर्स लीड्स या संघाने अबरारला 190,000 पाउंड (सुमारे 2.3 कोटी रुपये) देऊन खरेदी केले. आयपीएल मालकी असलेल्या संघांनी पाकिस्तानी खेळाडूंवर ‘शॅडो बॅन’ (बहिष्कार) घातल्याची चर्चा होती. मात्र, काव्या मारन यांनी अबरारवर बोली लावल्याने भारतीय चाहत्यांमध्ये नाराजी पसरली. अबरारच्या निवडीनंतर सोशल मीडियावर झालेल्या तीव्र टीकेनंतर सनरायझर्स लीड्सचे अधिकृत ‘X’ (ट्विटर) अकाउंट निलंबित करण्यात आले आहे.
भारतीय मालकीच्या संघाने एका पाकिस्तानी खेळाडूला विकत घेतल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला. “आजपासून मी सनरायझर्सचा चाहता नाही,” अशा संतप्त प्रतिक्रियांचा पूर आला. या वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर सनरायझर्स लीड्सचे अधिकृत एक्स अकाउंट सस्पेंड करण्यात आले. सध्या त्या पेजवर “या अकाउंटने एक्सच्या नियमांचे उल्लंघन केले आहे” असा संदेश दिसत आहे. मात्र नेमके कोणते नियम मोडले गेले, याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.








