Kavya Maran | भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणावामुळे आयपीएलमध्ये (IPL) पाकिस्तानी खेळाडूंना खेळण्यास बंदी आहे. याच कारणामुळे जगभरातील इतर क्रिकेट लीगमध्येही भारतीय मालकीचे संघ सहसा पाकिस्तानी खेळाडूंना खरेदी करणे टाळतात. मात्र, इंग्लंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘द हंड्रेड’ (The Hundred) स्पर्धेच्या लिलावात ‘सनरायझर्स लीड्स’ (Sunrisers Leeds) या संघाने ही अलिखित परंपरा मोडली आणि आता हा संघ मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
‘द हंड्रेड’ (The Hundred) या क्रिकेट स्पर्धेचा लिलाव नुकताच पार पडला, मात्र या लिलावानंतर भारतीय मालकीच्या सनरायझर्स लीड्स (Sunrisers Leeds) संघाला मोठ्या वादाचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमद याला संघात सामील करून घेतल्यामुळे सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, आता या वादाच्या पार्श्वभूमीवर संघाचे अधिकृत सोशल मीडिया अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे.
पाकिस्तानी खेळाडूवर लावली मोठी बोली
लिलावादरम्यान सनरायझर्स लीड्सने अबरार अहमदला सुमारे 2.55 लाख डॉलर्समध्ये खरेदी केले. भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंध लक्षात घेता, भारतीय मालकीचे संघ पाकिस्तानी खेळाडूंवर बोली लावणार नाहीत, अशी चर्चा आधीपासून होती. मात्र सनरायझर्स लीड्सने अचानक बोली लावत अबरार अहमदला संघात घेतले आणि त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
Sunrisers Leed’s Account Suspended pic.twitter.com/rSCcEUGY9K
— Ujjaval Palanpure (@ujjaval___) March 13, 2026
काव्या मारन यांचा अनपेक्षित निर्णय
सनरायझर्स हैदराबादची (SRH) मालकी असलेल्या ‘सन ग्रुप’ने गेल्या वर्षीच ईसीबी आणि यॉर्कशायरकडून ‘द हंड्रेड’मधील ‘नॉर्दर्न सुपरचार्जर्स’ ही फ्रँचायझी १०० टक्के विकत घेतली आणि तिचे नाव बदलून ‘सनरायझर्स लीड्स’ असे ठेवले. यंदाच्या लिलावात संघाच्या मालकीण काव्या मारन स्वतः उपस्थित होत्या. सर्व भारतीय फ्रँचायझींनी पाकिस्तानी खेळाडूंकडे पाठ फिरवली असताना, काव्या मारन यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज अबरार अहमद याला तब्बल 2 लाख 55 हजार डॉलर्सची बोली लावून आपल्या संघात सामील करून घेतले.
सोशल मीडियावर उडाला भडका आणि कारवाई
भारतीय मालकीच्या संघाने एका पाकिस्तानी खेळाडूला विकत घेतल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला. “आजपासून मी सनरायझर्सचा चाहता नाही,” अशा संतप्त प्रतिक्रियांचा पूर आला. या वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर सनरायझर्स लीड्सचे अधिकृत एक्स अकाउंट सस्पेंड करण्यात आले. सध्या त्या पेजवर “या अकाउंटने एक्सच्या नियमांचे उल्लंघन केले आहे” असा संदेश दिसत आहे. मात्र नेमके कोणते नियम मोडले गेले, याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.






