Omraje Nimbalkar | शिवसेना (Shiv Sena) नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या धाराशिव (Dharashiv) दौऱ्यापूर्वी खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी आपल्या राजकीय भूमिकेबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. पक्षांतरानंतर प्रथमच उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये येत असल्याने राजकीय वातावरण तापले असून, त्याआधी निंबाळकर यांनी आपल्या निर्णयामागील कारणे, जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि मंत्रिपदाबाबतची भूमिका स्पष्ट केली.
निर्णयामागील कारणांचा केला खुलासा :
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आपल्या मतदारसंघातील आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक समस्या दीर्घकाळ प्रलंबित आहेत. त्या प्रश्नांना न्याय मिळावा आणि विकासाला गती मिळावी, या उद्देशानेच आपण निर्णय घेतला आहे. विरोधात राहून काही लोकांनी सत्ताधारी पक्षांचा वापर करत एकाधिकारशाही निर्माण केली होती आणि विरोधी विचारांच्या लोकांना दडपण्याचा प्रयत्न होत होता. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपल्या निर्णयामुळे काही कार्यकर्ते आणि समर्थक नाराज असल्याचे मान्य करत त्यांनी सांगितले की, ही नाराजी त्यांच्या प्रेमातूनच व्यक्त होत आहे. काळ लोटल्यानंतर आपण घेतलेला निर्णय योग्य होता, हे आपल्या कामातून सिद्ध करून दाखवू. टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी वादाचा मार्ग स्वीकारणार नसून, प्रत्यक्ष विकासकामांच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सर्वसामान्यांमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी पूर्वीपेक्षा अधिक वेगाने पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Omraje Nimbalkar | मंत्रिपदासाठी निर्णय नसल्याचा दावा :
उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य सभेबाबत बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. आपण घेतलेल्या निर्णयासाठी त्यांनी कधीही उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक आरोप केले नाहीत, असे ते म्हणाले. आपल्या मतदारसंघातील नागरिकांना न्याय मिळावा, मागासलेला म्हणून ओळखला जाणारा जिल्हा विकासाच्या मुख्य प्रवाहात यावा आणि लोकांच्या अडचणी दूर व्हाव्यात, यासाठीच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.
यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचाही उल्लेख करत, ते नागरिकांना वेळ देणारे नेते असल्याचे सांगितले. आपण कोणत्याही मंत्रिपदाची अट घालून सत्तेत सहभागी झालो नसून, पद मिळवण्यासाठी हा निर्णय घेतलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. हा निर्णय विष पचवल्यासारखा कठीण असल्याचे नमूद करत, गेल्या दहा दिवसांत झालेली टीका कोणत्याही सामान्य व्यक्तीसाठी सहन करणे अवघड असल्याचेही त्यांनी म्हटले.






