TET Exam | टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा विचार सुरू असून, त्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत केली आहे.
पेपरफुटीनंतर सरकारची मोठी कारवाई :
28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पेपरफुटीची माहिती 27 जूनलाच समोर आल्यानंतर रद्द करण्यात आली होती. आता या परीक्षेची नवीन तारीख महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच जाहीर केली जाणार आहे. दरम्यान, या प्रकरणावर विधानसभेत चर्चा झाली असता शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तपासासंदर्भातील माहिती सभागृहात दिली.
त्यांनी सांगितले की, पेपर विक्रीसाठी आलेल्या तिघांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांच्या ताब्यातून टीईटीची प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आली. या प्रकरणी राजू प्रयाग शाम याच्यासह आणखी दोघांविरोधात भिवंडीतील कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 27 जून रोजी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
TET Exam | ऑनलाइन परीक्षेसाठी समिती स्थापन होणार :
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पुढे सांगितले की, प्रश्नपत्रिकांची विक्री मोठ्या आर्थिक व्यवहारातून केली जाणार होती. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. तपासासाठी हरियाणा, बिहार आणि दिल्ली येथेही पोलिसांची विशेष पथके रवाना झाली असून, या प्रकरणात मकोका लागू करण्याच्या दृष्टीनेही तपास सुरू आहे. तसेच पुनर्परीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्नपत्रिका आग्र्यात का छापल्या जातात, असा सवाल उपस्थित केला. यावर उत्तर देताना शिक्षणमंत्र्यांनी परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार असल्याचे सांगितले. या समितीच्या शिफारशीनुसार पुढील वर्षापासून परीक्षा प्रक्रिया आणि प्रश्नपत्रिका पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.






