सियाला जिंकण्यासाठी चेतनचं धक्कादायक कृत्य! लोहगडावरील गूढ आलं समोर

On: June 29, 2026 5:41 PM
Ketan Agarwal Case
---Advertisement---

Ketan Agrawal Case | लोहगड किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांची चौकशी सुरू असताना दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. याच चौकशीत हत्येचा कट कसा रचला गेला आणि तो प्रत्यक्षात कसा अंमलात आणला गेला, याबाबत पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

हत्येचा कट आणि ठरवलेला सिग्नल :

तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, केतन अग्रवालला दरीत ढकलण्यासाठी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी आधीपासूनच एक सांकेतिक इशारा निश्चित केला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 14 जून रोजी केतनला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्या वेळी सियाला हे कृत्य करता आले नाही. यापूर्वीही दोन वेळा तिने केतनला लोहगडावर नेले होते, पण दोन्ही प्रयत्न अपयशी ठरले.

चौकशीदरम्यान सियाने सांगितल्याप्रमाणे, सलग अपयशानंतर चेतन संतापला आणि त्याने स्वतःच केतनचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्याने सियाला, “तुझ्याकडून हे होत नाही, आता मीच हे काम पूर्ण करतो,” असे सांगितल्याचे पोलिसांना कळाले. त्यानंतर 18 जून रोजी दोघांनी आखलेल्या योजनेनुसार चेतनने केतनला लोहगडावरील सुमारे 400 फूट खोल दरीत ढकलल्याचा तपासातून दावा करण्यात आला आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, केतनचा अडथळा दूर करून सियासोबत पुढील आयुष्य घालवण्याचा चेतनचा हेतू असल्याचेही समोर आले आहे.

Ketan Agrawal Case | चौकशीत दोघांचे परस्परांवर आरोप :

पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हत्येपूर्वी दोघांनी एक कोड सिग्नल निश्चित केला होता. सियाने ठरलेल्या ठिकाणी बसून संकेत द्यायचा आणि त्यानंतर चेतनने पुढे येऊन केतनला दरीत ढकलायचे, अशी योजना आखण्यात आली होती. तपासादरम्यान दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरील संपूर्ण घटनाक्रम पोलिसांसमोर सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. केतनला त्याच्यावर हल्ला होणार असल्याची कोणतीही कल्पना नव्हती आणि काही समजण्यापूर्वीच त्याला दरीत ढकलण्यात आल्याचेही चौकशीत समोर आले.

दरम्यान, चौकशीच्या सुरुवातीला सिया आणि चेतन यांनी एकमेकांवर गुन्ह्याची जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. चेतनने सुरुवातीला आपण घटनास्थळी गेलोच नसल्याचा दावा केला होता. मात्र तपासातील पुरावे आणि चौकशीनंतर दोघांनीही गुन्ह्यातील आपापली भूमिका मान्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच संपूर्ण कट सियाने रचला होता आणि चेतन त्यात सहभागी होता, अशी कबुलीही चौकशीत मिळाल्याचे पोलिसांनी नमूद केले.

News Title: Ketan Murder Case: New Lohagad Conspiracy Revealed

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now