Bank Loan News | लहान कर्ज घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण लवकरच UPI अॅप्सच्या माध्यमातून थेट लहान कर्ज उपलब्ध होणार आहे. बँकेत वारंवार जाऊन अर्ज करण्याची गरज भासणार नाही, तर घरबसल्या मोबाइलवरूनच कर्ज मिळू शकेल. रिझर्व्ह बँकेने (RBI) या योजनेला हिरवा कंदील दाखवला असून, बँकांनी ग्राहकांसाठी तयारी सुरू केली आहे.
या नव्या व्यवस्थेत ग्राहकांचे क्रेडिट खाते थेट यूपीआय अॅपशी जोडले जाईल. त्यामुळे सोने कर्ज, मुदत ठेवींवर कर्ज, ग्राहक कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज घेणे सोपे होणार आहे. यामुळे लाखो ग्राहकांचा वेळ वाचणार असून, छोट्या रकमेच्या कर्जासाठी बँकांच्या दारात जावे लागणार नाही. (Bank Loan News)
UPI वर कर्जाची नवी सोय :
फोनपे, पेटीएम, भारतपे, नवी यांसारख्या लोकप्रिय UPI अॅप्सद्वारे लवकरच कर्ज घेता येणार आहे. ICICI सारख्या मोठ्या बँकांपासून कर्नाटक बँकेसारख्या लहान बँकांपर्यंत सर्वच बँका या उत्पादनाचा विस्तार करण्यासाठी सज्ज होत आहेत.
RBI ने व्याजमुक्त कालावधी, थकबाकीची नोंद आणि क्रेडिट ब्युरोला माहिती देण्याच्या नियमांवर स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात या योजनेची चाचणी सुरू झाली आहे. ही सेवा ग्राहकांना मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.
Bank Loan News | एनपीसीआयची भूमिका आणि वाढती संधी :
यूपीआय प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या एनपीसीआयने (NPCI) सप्टेंबर 2023 मध्येच पूर्व-मंजूर क्रेडिट लाइनची सुविधा सुरू केली होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे बहुतांश बँका ती सुरू करू शकल्या नव्हत्या. आता परिस्थिती बदलत असून बँकांनी या नव्या सोयीसाठी तयारी केली आहे. (Bank Loan News)
सध्या भारतात UPI चे सुमारे 30 कोटी वापरकर्ते आहेत. त्यापैकी 15 ते 20 कोटी सक्रिय वापरकर्ते आहेत. उद्योग तज्ञांचे मत आहे की क्रेडिट हे UPI साठी पुढचे मोठे पाऊल ठरेल. फिनटेक कंपनी झेटाचा अंदाज आहे की 2030 पर्यंत UPI वर तब्बल 1 ट्रिलियन डॉलर्स किमतीचे व्यवहार होऊ शकतात.
जोखीम आणि आव्हाने :
तथापि, या योजनेसह काही जोखीमही आहेत. खासगी बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, जर क्रेडिटची अंमलबजावणी काळजीपूर्वक केली नाही तर डिफॉल्ट वाढू शकतात. लहान कर्जांची वसुली हे बँकांसमोर मोठे आव्हान ठरेल.
यामुळे RBI आणि बँकांनी जोखीम व्यवस्थापनावर भर द्यावा लागेल. तरीही, ही योजना प्रत्यक्षात आली तर लाखो ग्राहकांना घरबसल्या जलद व सोयीस्कर कर्ज मिळेल.






