Ladaki Bahin Scheme | महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेत रक्कम वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र सत्तेतील पाच महिने उलटूनही अद्याप निर्णय न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये नाराजी असून, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या एका विधानामुळे आता नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. (Ladaki Bahin Scheme)
पाच महिने उलटले तरी 2100 रुपयांचा निर्णय नाही
महाराष्ट्रात महायुती सरकार (Mahayuti Government) सत्तेवर आल्यापासून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ‘माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. विधानसभा निवडणुकीत योजनेतील रक्कम 2100 रुपये केली जाईल, असे जाहीर आश्वासन देण्यात आले होते.
मात्र सरकारच्या सत्तेचा पहिला अर्थसंकल्प होऊनही याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे हजारो लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. महिलांच्या अपेक्षा वाढल्या असताना अद्याप निर्णय न झाल्याने सरकारवर टीकेची झोड उठत आहे.
नीलम गोऱ्हे यांचं मिश्कील उत्तर, पाच वर्षांची वाट पाहावी लागणार?
शिवसेना (Shivsena) शिंदे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी या विषयावर बोलताना मिश्कील अंदाजात म्हटले की, “2100 रुपये मिळायला पाच वर्षे लागतील.” त्यांच्या या वक्तव्यामुळे आता हे पैसे इतक्या लवकर मिळणारच नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होतोय.
नीलम गोऱ्हे यांनी पुढे स्पष्ट केले की, “राज्य सरकारचे पाच अर्थसंकल्प असतील. 2100 रुपये कधी द्यायचे हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ मिळून निर्णय घेतील. राज्याची आर्थिक स्थिती पाहून योग्य वेळी रक्कम वाढवली जाईल. योजनेची रक्कम नेमक्या कोणत्या तारखेला मिळेल, असं कोणत्याही नेत्याने सांगितले नव्हते.”
या विधानावरून स्पष्ट होते की, रक्कम वाढवण्याचा निर्णय अजून प्रक्रियेत असून त्यासाठी निश्चित कालमर्यादा अद्याप ठरलेली नाही. त्यामुळे ‘लाडकी बहिण’ लाभार्थींना सध्या तरी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
Title : No Timeline for 2100 in Ladaki Bahin Scheme






