गर्दीवर नियंत्रणासाठी नव्या प्रणालींचा अमल
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले की, चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर रेल्वेने ठरवले आहे की, ट्रेनमधील उपलब्ध जागांनुसारच तिकीट विक्री केली जाईल. यामध्ये वेटिंग तिकीटवाल्यांना आता स्टेशनमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्यांच्या प्रवेशावर निर्बंध आणण्यात आले असून, केवळ कन्फर्म आरक्षण असलेल्यांनाच प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळणार आहे.
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे स्थानकांवर रुंद फूट ओव्हरब्रिज, सीसीटीव्ही कॅमेरे आणि ‘वॉर रूम’ यंत्रणा उभारण्यात आली आहे. सण, यात्रा आणि महाकुंभासारख्या प्रसंगी होणाऱ्या प्रचंड गर्दीसाठी रेल्वेने ‘मर्यादित प्रवेश नियंत्रण प्रणाली’ (Restricted Entry System) लागू केली आहे. यामध्ये प्रवाशांना ट्रेन प्लॅटफॉर्मवर येईपर्यंत होल्डिंग एरियामध्ये थांबावं लागणार आहे.
६० प्रमुख स्थानकांवर कायमस्वरूपी यंत्रणा राबवणार
फेस्टिव्हल सीझनमध्ये सुरत, उधना, पाटणा आणि नवी दिल्ली येथे या होल्डिंग एरियांचा यशस्वी प्रयोग करण्यात आला होता. प्रयागराजच्या नऊ स्थानकांवर महाकुंभ दरम्यान ही प्रणाली वापरण्यात आली. यावरून सकारात्मक प्रतिसाद पाहता, आता देशभरातील ६० महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर ही व्यवस्था कायमस्वरूपी लागू करण्यात येणार असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.
अनधिकृत प्रवेशबिंदू बंद करण्यात येणार असून, वृद्ध, महिला आणि निरक्षर प्रवाशांच्या सोयीसाठी केवळ काही प्रमाणात प्लॅटफॉर्म तिकीट जारी केले जातील. वेटिंग यादीतील आणि तिकीट नसलेल्या प्रवाशांना स्टेशनबाहेरील वेटिंग एरियामध्ये थांबावे लागेल. या नव्या योजनेमुळे रेल्वेस्थानकांवरील गर्दी कमी होईल आणि अशा दुर्घटनांना प्रतिबंध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.






