नितीन गडकरींच्या शिरपेचात मानाचा तुरा, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर!

On: July 23, 2025 1:47 PM
Lokmanya Tilak Award 2025
---Advertisement---

Lokmanya Tilak Award 2025 | केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे (हिंद स्वराज्य संघ) हा प्रतिष्ठित पुरस्कार १ ऑगस्ट २०२५ रोजी पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात प्रदान करण्यात येणार आहे. हा सन्मान गडकरी यांच्या राष्ट्रनिर्माणातील भरीव योगदानासाठी देण्यात येणार आहे.

या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पुरस्कार वितरण डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते होईल. यावेळी टिळक कुटुंबातील इतर विश्वस्त आणि मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.

गडकरींची राष्ट्रनिर्मितीत मोलाची भूमिका :

डॉ. रोहित टिळक यांनी नितीन गडकरी यांची निवड का केली याचे स्पष्टीकरण दिलं. त्यांच्या मते, गडकरींनी सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या (PPP) मॉडेलद्वारे देशभर रस्त्यांचं जाळं उभारून विकासाला गती दिली आहे. नमामी गंगा, स्वदेशी वाहन तंत्रज्ञानाचा प्रसार, तसेच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचे यशस्वी काम – या सर्वांमधून गडकरींचे दूरदृष्टीशील नेतृत्व दिसते. (Lokmanya Tilak Award 2025)

लोकमान्य टिळकांच्या स्वदेशी विचारसरणीला पुढे नेत गडकरींनी विकासाच्या माध्यमातून देशाची उभारणी केली असल्याने हा सन्मान त्यांना अत्यंत उचित आहे, असे डॉ. टिळक म्हणाले. त्यांनी नमूद केले की, गडकरींची कामगिरी ही केवळ राजकीय नसून ती सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचा आधार आहे.

Lokmanya Tilak Award 2025 | पुरस्काराचे स्वरूप आणि गौरवशाली परंपरा :

या पुरस्कारात स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि १ लाख रुपयांची रोख रक्कम दिली जाते. हा पुरस्कार १९८३ पासून दिला जात आहे. आजवर या पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग, डॉ. के. सिवन, सुधा मूर्ती, डॉ. सायरस पुनावाला यांसारख्या दिग्गजांचा सन्मान झाला आहे. (Lokmanya Tilak Award 2025)

या वर्षीच्या सोहळ्यात या पुरस्काराची गौरवशाली परंपरा सांगणारा विशेष इंग्रजी ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार असून त्याचे प्रकाशन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होईल. हा ग्रंथ पूर्वीच्या सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या कार्यावर आधारित असेल.

News Title: Nitin Gadkari to Receive Lokmanya Tilak National Award 2025 for Nation-Building Contribution

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now