१ एप्रिलपासून तुमचे बजेट बदलणार! नवीन ‘इन्कम टॅक्स’ नियम लागू

On: March 23, 2026 6:24 PM
Income Tax Rules 2026
---Advertisement---

New Income Tax Rule | देशात 1 एप्रिल 2026 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असून त्यासोबत आयकर नियमांमध्येही महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. या नव्या नियमांचा थेट परिणाम पगारदार वर्गावर होण्याची शक्यता आहे. वेतन, घराची सुविधा, कंपनीकडून दिली जाणारी गाडी तसेच विविध भत्त्यांवरील कररचनेत बदल करण्यात आले आहेत.

नवीन नियमांमुळे काही बाबतीत कराचा भार कमी होऊ शकतो, तर काही सुविधांवर कर लागू होणार असल्यामुळे काही कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून प्रत्यक्षात हातात येणारा पगार वाढणार की कमी होणार, याबाबत अनेकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

आयकर नियमांमध्ये मोठे बदल :

केंद्र सरकारकडून लागू करण्यात येणाऱ्या नव्या आयकर व्यवस्थेनुसार विविध सुविधांचे मूल्य ठरवण्यासाठी निश्चित सूत्र लागू केले जाणार आहे. यामुळे कर प्रणाली अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नव्या नियमांनुसार आयकर नियमांची संख्या 511 वरून कमी करून 333 करण्यात आली आहे.

कंपनीकडून मिळणाऱ्या घराच्या सुविधेवर कर मोजण्याची पद्धतही बदलण्यात आली आहे. शहराच्या लोकसंख्येनुसार कर आकारला जाणार आहे. 40 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पगाराच्या सुमारे 10 टक्के कर आकारला जाईल. 15 ते 40 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी हा दर 7.5 टक्के असेल, तर लहान शहरांमध्ये 5 टक्के दर लागू राहील. याआधी हा दर 15 टक्क्यांपर्यंत होता, त्यामुळे काही कर्मचाऱ्यांना करात दिलासा मिळू शकतो.

New Income Tax Rule | गाडी, ड्रायव्हर आणि इतर सुविधांवरील कर :

नव्या आयकर नियमांनुसार कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या गाड्यांवरील कररचनेतही बदल करण्यात आले आहेत. 1.6 लिटरपर्यंत इंजिन क्षमतेच्या वाहनांसाठी दरमहा सुमारे 5,000 रुपयांचा कर लागू होणार आहे. तर 1.6 लिटरपेक्षा जास्त इंजिन क्षमतेच्या गाड्यांसाठी हा कर सुमारे 7,000 रुपये प्रतिमहिना असेल. याशिवाय कंपनीकडून ड्रायव्हरची सुविधा मिळत असल्यास त्यासाठी अतिरिक्त 3,000 रुपयांचा कर आकारला जाणार आहे. (New Income Tax Rule)

दरम्यान, कर्मचाऱ्यांसाठी काही दिलासादायक बदलही करण्यात आले आहेत. ऑफिसमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणावरील करमुक्त मर्यादा वाढवण्यात आली आहे. आता प्रत्येक जेवणासाठी 200 रुपयांपर्यंतचा खर्च करमुक्त राहणार आहे, जो यापूर्वी केवळ 50 रुपये होता. तसेच गिफ्ट्स आणि व्हाउचर्ससाठीची करमुक्त मर्यादा वाढवून 15 हजार रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीला किंवा कार्यालयातून मिळणाऱ्या भेटवस्तूंवर अतिरिक्त कराचा भार येणार नाही, असा दिलासा पगारदार कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे.

News title : New Income Tax Rules From April 1

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now