GST Slab Change | नवी दिल्लीमध्ये झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत लागू असलेले १२% आणि २८% जीएसटी स्लॅब रद्द करण्यात आले असून, देशात आता फक्त ५% आणि १८% असे दोनच जीएसटी स्लॅब राहणार आहेत. या निर्णयामुळे अनेक वस्तू स्वस्त तर काही लक्झरी वस्तू महाग होणार आहेत. (GST Slab Change)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी जीएसटीमध्ये मोठा बदल होणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर कौन्सिल बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य ग्राहक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी हा निर्णय दिलासा देणारा ठरत आहे.
काय होणार स्वस्त? :
नव्या जीएसटी रचनेनुसार अनेक वस्तूंवर कर कमी किंवा शून्य करण्यात आला आहे. आरोग्य विमा, पनीर पराठा, खाकरा, चपाती, तंदूर रोटी, दूध, पिझ्झा यांसारख्या दैनंदिन जीवनातील खाद्यपदार्थांवर आता जीएसटी लागणार नाही. याशिवाय ३३ जीवनरक्षक औषधे आणि गंभीर आजारांवरील औषधेही शून्य कर श्रेणीत आणण्यात आली आहेत.
विद्यार्थ्यांसाठी वह्या, पेन्सिल, शार्पनर, क्रेयॉन्स, खोडरबर, नकाशे, चार्ट आणि ग्लोब या शैक्षणिक वस्तूही आता स्वस्त होणार आहेत. त्याचबरोबर शिलाई मशिन, ट्रॅक्टर व त्याचे सुटे भाग, सिंचनासाठी लागणारी उपकरणे, बाळांची बाटली, डायपर, नॅपकिन्स, औषध तपासणीसाठी लागणारी उपकरणे यांवर फक्त ५% जीएसटी लागू होईल.
GST Slab Change | काय होणार महाग? :
जीएसटीच्या नव्या रचनेमुळे काही लक्झरी वस्तूंवर कराचा भार वाढणार आहे. कार, बाईक आणि महागड्या वाहनांवर आता विशेष स्लॅब लागू करण्यात येणार आहे. विशेषतः ३५० सीसीपेक्षा जास्त इंजिन असलेल्या बाईक्स महाग होण्याची शक्यता आहे.
याशिवाय तंबाखू, पान मसाला, फ्लेवरयुक्त ड्रिंक्स, पॅकेज्ड फळांचे पेये या वस्तूंवरील जीएसटी दर वाढवण्यात आला आहे. त्यामुळे या वस्तूंच्या किंमती वाढतील.
दरम्यान, या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळणार असला तरी सरकारला महसुलात तफावत भरून काढण्यासाठी लक्झरी वस्तूंवर अतिरिक्त भार टाकावा लागणार आहे. व्यापाऱ्यांसाठीही करप्रक्रिया सोपी होणार असून दोनच स्लॅबमुळे कर भरणे आणि हिशेब ठेवणे सुलभ होईल.






