Covid new variant | कोविड-19 (COVID-19) महामारी संपल्याचे चित्र निर्माण होत असतानाच आता एका नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे. BA.3.2 नावाचा हा प्रकार अमेरिकेसह 22 देशांमध्ये आढळून आला आहे. संशोधकांनी या व्हेरिएंटला ‘सिकाडा’ असे टोपणनाव दिले आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या म्युटेशनमुळे तो किती संसर्गजन्य ठरू शकतो आणि सध्याच्या लसी त्यावर किती प्रभावी असतील, याबाबत तज्ज्ञ अभ्यास करत आहेत.
BA.3.2 ‘सिकाडा’ व्हेरिएंटची ओळख आणि प्रसार :
नवीन BA.3.2 हा ओमिक्रॉन (Omicron) परिवारातील एक सब-व्हेरिएंट मानला जातो. मात्र हा सध्या जगभर प्रचलित असलेल्या JN.1 प्रकारापेक्षा वेगळा असल्याचे संशोधक सांगतात. BA.3 या जुन्या श्रेणीतील हा एक दुर्मिळ वंशज मानला जातो, जो 2022 नंतर फारसा सक्रिय दिसला नव्हता. दीर्घकाळ शांत राहिल्यानंतर अचानक सक्रिय झाल्यामुळे वैज्ञानिकांनी याला ‘Cicada’ असे नाव दिले. सिकाडा नावाचा कीटक अनेक वर्षे जमिनीखाली सुप्त अवस्थेत राहून अचानक बाहेर येतो, त्यावरून या व्हेरिएंटचे नामकरण करण्यात आले आहे. (Cicada variant symptoms)
अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (Centers for Disease Control and Prevention) च्या माहितीनुसार अमेरिकेतील 24 हून अधिक राज्यांमध्ये या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. कॅलिफोर्निया (California), न्यूयॉर्क (New York), टेक्सास (Texas), फ्लोरिडा (Florida), न्यू जर्सी (New Jersey), वॉशिंग्टन (Washington) आणि मिशिगन (Michigan) यांसारख्या प्रमुख राज्यांतही त्याची नोंद झाली आहे. तसेच जगभरातील किमान 22 देशांमध्ये त्याचे अस्तित्व आढळले आहे. युरोपमधील डेन्मार्क (Denmark), जर्मनी (Germany) आणि नेदरलँड्स (Netherlands) येथे 2025 च्या शेवटच्या महिन्यांपासून 2026 च्या सुरुवातीपर्यंत गोळा केलेल्या नमुन्यांपैकी सुमारे 30 टक्के नमुने या प्रकाराशी संबंधित असल्याचे आढळले आहे. (Omicron subvariant)
Covid new variant | लक्षणे, धोका आणि लसींचा प्रभाव :
BA.3.2 या व्हेरिएंटमध्ये 70 ते 75 पेक्षा जास्त म्युटेशन आढळल्याने तो अधिक संसर्गजन्य असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाचे (Johns Hopkins University) व्हायरोलॉजिस्ट अँड्र्यू पेकोझ (Andrew Pekosz) यांच्या मते सध्या हा व्हेरिएंट तातडीचा मोठा धोका वाटत नसला तरी तो वेगाने बदलत असल्यामुळे भविष्यात त्याचा परिणाम वाढू शकतो. म्युटेशनची संख्या जास्त असल्याने शरीरातील नैसर्गिक अँटीबॉडीज किंवा लसीमुळे तयार झालेली प्रतिकारशक्ती काही प्रमाणात चकवण्याची क्षमता त्याच्यात असू शकते, असेही तज्ज्ञांचे मत आहे. (Cicada variant symptoms)
आरोग्य तज्ज्ञांच्या मते या व्हेरिएंटची लक्षणे इतर कोविड प्रकारांप्रमाणेच आहेत, मात्र घशात तीव्र खवखव हे एक ठळक लक्षण मानले जात आहे. याशिवाय सतत खोकला, ताप किंवा थंडी वाजणे, नाक बंद होणे किंवा वाहणे, वास किंवा चव जाण्याची क्षमता कमी होणे, अत्यंत थकवा जाणवणे, स्नायूंमध्ये वेदना, डोकेदुखी, मळमळ किंवा उलट्या अशी लक्षणे दिसू शकतात. काही गंभीर रुग्णांमध्ये श्वास घेण्यास त्रासही होऊ शकतो.






