MHADA Lottery 2025 | नाशिककरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. परवडणाऱ्या दरातील घरांसाठी ओळखल्या जाणाऱ्या म्हाडाने आता नाशिकमध्येही मोठी लॉटरी जाहीर केली आहे. मुंबई आणि पुण्यानंतर नाशिकमध्ये ही मोठी घोषणा करण्यात आली असून एकूण 402 घरांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात सोमवारी अर्ज नोंदणी व स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Nashik MHADA Lottery 2025)
शहरातील विविध महत्त्वाच्या भागांमध्ये ही घरे उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी म्हाडाने 2025 मध्ये तीन लॉटरींद्वारे 846 घरे विक्रीसाठी दिली होती. यानंतर ही 2025 मधील चौथी लॉटरी आहे. त्यामुळे नाशिकमधील स्वतःचे घर या स्वप्नाकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
कुठे उपलब्ध होणार घरे आणि कशी असेल किंमत? :
चुंचाळे, पाथर्डी, मखमलाबाद, आडगाव आणि सातपूर शिवार या भागांतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील 402 घरे या लॉटरीद्वारे देण्यात येणार आहेत. ही सर्व घरे अॅडव्हान्स कंट्रिब्युशन तत्वावर आहेत, म्हणजेच सध्या घरे बांधकामाधीन असून लॉटरीत यशस्वी ठरलेल्या अर्जदारांना किंमत पाच टप्प्यांत भरता येणार आहे.
या घरांची किंमत ₹14,94,000 ते ₹36,75,023 इतकी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कमी ते मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना या लॉटरीद्वारे परवडणाऱ्या घरांची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
MHADA Lottery 2025 | कोणत्या गटासाठी किती घरे राखीव? :
अल्प उत्पन्न गटासाठी (EWS/LIG) सर्वाधिक घरे उपलब्ध आहेत. चुंचाळे शिवारात 138, पाथर्डी येथे 30, मखमलाबादमध्ये 48 तर आडगाव येथे 77 अशी एकूण 293 घरे अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) सातपूरमध्ये 40, पाथर्डी येथे 35 आणि आडगाव येथे 34 अशी एकूण 109 घरे देण्यात आली आहेत.
या विभागणीमुळे दोन्ही गटांतील नागरिकांना त्यांच्या बजेटनुसार घर निवडण्याची अधिक मोकळीक मिळणार आहे. विशेष म्हणजे, यामध्ये सर्व प्रकल्प शहराच्या वाढत्या भागात असल्याने भविष्यातील दृष्टीनेही ही घरे फायदेशीर ठरणार आहेत.
अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक? :
अर्जदारांना 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीतील उत्पन्नाचा पुरावा सादर करावा लागेल. यासाठी आयकर विवरणपत्र (ITR) किंवा तहसील कार्यालयाचे उत्पन्न प्रमाणपत्र यापैकी एक दस्तऐवज अनिवार्य आहे. अर्जदाराने दिलेल्या माहितीची पडताळणी करूनच लॉटरीसाठी पात्रता निश्चित केली जाईल. (Nashik MHADA Lottery 2025)
म्हाडा नाशिक लॉटरी 2025 ही संधी नाशिककरांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून सध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत परवडणाऱ्या किंमतीत घरे मिळण्याची ही दुर्मिळ संधी आहे.





