नांदेडकरांसाठी गुड न्यूज! 18 दिवसांनी प्रवाशांना मिळाला मोठा दिलासा

On: September 10, 2025 1:42 PM
Nanded Airport Flights
---Advertisement---

Nanded Airport Flights | नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी आहे. तब्बल 18 दिवस बंद राहिलेली विमानसेवा अखेर आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. धावपट्टीच्या दुरुस्तीमुळे 22 ऑगस्टपासून नांदेड विमानतळावरील उड्डाणे थांबवावी लागली होती. त्यामुळे नागरिकांना मोठी गैरसोय सहन करावी लागली. मात्र, तातडीने काम पूर्ण करून अखेर सेवा पूर्ववत करण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. (Nanded Airport Flights)

नांदेड विमानतळावर 10 सप्टेंबरपासून पुन्हा विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग सुरू झाले आहे. प्रशासनाने युद्धपातळीवर काम करत धावपट्टीसह अन्य आवश्यक दुरुस्त्या वेळेत पूर्ण केल्या. त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांना थेट नांदेडहून विविध शहरांसाठी हवाई प्रवासाची सोय उपलब्ध झाली आहे.

विमानतळ व्यवस्थापनातील बदल :

नांदेड विमानतळ सुमारे 15 वर्षांपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजला विकास आणि वापरासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आला होता. मात्र, देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विमानतळ परत घेतले आणि ते महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीकडे हस्तांतरित केले. यावेळी करण्यात आलेल्या पाहणीत धावपट्टी योग्य स्थितीत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) ने 22 ऑगस्टपासून तातडीने विमानसेवा बंद करण्याचे आदेश दिले होते. (Nanded Airport Flights)

या निर्णयानंतर प्रवाशांकडून नाराजी व्यक्त झाली होती. अनेकांना नियोजित प्रवास रद्द करावा लागला, तर व्यावसायिकांना मोठा तोटा सोसावा लागला. मात्र, आता विमानतळावर नव्या दुरुस्त्या पूर्ण झाल्याने उड्डाणे सुरक्षितरीत्या सुरू झाली आहेत.

Nanded Airport Flights | खासदार चव्हाणांचे आभार प्रदर्शन :

या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान नांदेडकरांकडून सातत्याने दबाव वाढत होता. यावर प्रशासनाने तातडीने कामाला गती दिली. खासदार अशोक चव्हाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के. राममोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हे काम तातडीने पूर्ण झाले, असे ते म्हणाले.

सध्या स्टार एअरलाइन्समार्फत नांदेडहून बंगळूर, अहमदाबाद, हिंडन, भूज, जालंधर, हैदराबाद आणि पुणे या शहरांसाठी सेवा सुरू आहे. या मार्गांना प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय ‘फ्लाय 91’ (Fly 91) कंपनीने जुलै महिन्यात नांदेडहून गोवा आणि बंगळूरसाठी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. विमानतळाची दुरुस्ती पूर्ण झाल्याने आता या सेवाही लवकरच सुरू होतील, अशी अपेक्षा आहे.

नांदेड विमानतळ पुन्हा सुरू झाल्यामुळे नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या विमानसेवेच्या पुनरारंभामुळे मराठवाड्याच्या विकासाला नवी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

News Title : Nanded Airport resumes flights after 18 days, major relief for passengers

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now