Nakul Bhoir | पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील नकुल भोईर (Nakul Bhoir) हत्याकांड प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पत्नीनेच पतीचा गळा आवळून खून केल्याच्या घटनेने शहर हादरले असताना, आता हे हत्याकांड घडण्यापूर्वी दोघांनी एकत्र दारूची पार्टी केल्याचे आणि नशेच्या अवस्थेतच पत्नीने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे.
नक्की काय घडलं?
नकुल भोईर (Nakul Bhoir) हत्याकांडात आता एक नवा आणि खळबळजनक खुलासा झाला आहे. आरोपी पत्नी चैताली (Chaitali Bhoir) आणि मयत नकुल या दोघांनीही हत्येपूर्वी एकत्र मद्य सेवन केले होते. अनेकदा दोघे सोबत पार्टी करत असत आणि गुरुवारी रात्रीही (२३ ऑक्टोबर) त्यांनी पार्टीचा बेत आखला होता. नकुल सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते, तर चैतालीला आगामी महापालिका निवडणूक लढवून नगरसेवक व्हायचे होते.
पार्टीदरम्यान नकुलने (Nakul Bhoir) प्रमाणापेक्षा जास्त मद्य प्राशन केले होते, ज्यामुळे तो पूर्णपणे नशेच्या अधीन होता. दुसरीकडे, चैतालीनेही मद्य सेवन केले होते. नकुल हा नेहमी चैतालीच्या चारित्र्यावर संशय घेत असे, याच कारणावरून सायंकाळी त्यांच्यात वाद झाला होता, जो रात्री पार्टीनंतर पुन्हा उफाळून आला. नशेत असल्याने नकुल पत्नीचा प्रतिकार करू शकला नाही, तर चैतालीनेही रागाच्या भरात ओढणीने त्याचा गळा आवळला, ज्यात नकुलचा मृत्यू झाला.
समाजसेवक पती, नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहणारी पत्नी
नकुल भोईर हे सामाजिक कार्यात सक्रिय होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar group) पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. आपल्या पत्नी चैतालीने राजकारणात यावे अशी त्यांची इच्छा होती आणि आगामी पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिका निवडणुकीत तिला नगरसेवक बनवण्यासाठी ते प्रयत्नशील होते.
मात्र, त्यांच्यातील कौटुंबिक वाद, विशेषतः चारित्र्यावरील संशयाने या सुखी संसाराला ग्रहण लावले होते. दोघांमधील हा वाद इतका विकोपाला गेला की, दारूच्या नशेतील भांडणाने एका समाजसेवकाचा बळी घेतला आणि एका महिलेला पतीच्या हत्येप्रकरणी तुरुंगात जावे लागले. चैतालीने गुन्ह्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन कबुली दिली होती. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, लवकरच आरोपपत्र दाखल केले जाईल अशी अपेक्षा आहे.






