Nagpur Violence | नागपूरमधील हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत 51 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. यामध्ये मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा (MDP) शहराध्यक्ष फहीम शमीम खान (Fahim Khan) याचे नाव आघाडीवर आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नागपूर दंगलीचा मुख्य सूत्रधार फहीम खान असल्याचा दावा करण्यात आला आहे. (Nagpur Violence)
फहीम खानवर गंभीर आरोप
फहीम खानने 11 वाजता 30-40 जणांचा जमाव गोळा करून पोलिस ठाण्यात निवेदन देण्यासाठी नेले होते. त्यावेळी त्याने विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दिली होती, ज्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. मात्र, त्यानंतरही त्याने पुन्हा जमाव एकत्र केला आणि हिंसाचारास प्रवृत्त केले.
पोलिस तपासात समोर आले आहे की, फहीम खानने आंदोलनकर्त्यांना भडकवत सांगितले की, “पोलिस हिंदू समाजाचे आहेत, ते आपली मदत करणार नाहीत.” या भडकावू वक्तव्यांमुळे परिस्थिती आणखी चिघळली.
फहीम खानची पार्श्वभूमी
फहीम खान हा 38 वर्षांचा असून त्याचे शिक्षण केवळ दहावीपर्यंत झाले आहे. यापूर्वी त्याने विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देखील दाखल केली होती, मात्र त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.
दरम्यान, नागपूरच्या झोन 3, 4 आणि 5 या भागातील 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये, तसेच पाच किंवा अधिक जणांनी एकत्र येऊ नये, असे आदेश पोलिसांनी दिले आहेत. नागपूरच्या इतर भागांत परिस्थिती नियंत्रणात असून वाहतूक आणि दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू आहेत.
Title : Nagpur Violence Mastermind Fahim Khan






